दिवसभरात 14 हजार नवे बाधित- मृत्यूदरात मात्र घट
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑक्टोबर महिन्यापासून भारतात कोरोनाच्या मृत्यूदरामध्ये विलक्षण घट होत असल्याचे दिसत आहे. रविवारी देशातील मृत्यूदर 1.43 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. देशात रविवारी सकाळपर्यंत अखेरच्या चोवीस तासात केवळ 90 मृत्यूंची नोंद झाल्यामुळे मृत्यूदरात घसरण दिसून आली. मात्र, कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात रविवारी सकाळपर्यंतच्या अखेरच्या चोवीस तासात 14 हजारहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत.
भारतात आतापर्यंत 1 कोटी 09 लाख 91 हजार 651 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 1 कोटी 6 लाख 89 हजार 715 रुग्ण योग्य उपचाराअंती बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 11 हजार 667 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचा जगातील सर्वाधिक उच्च दर असलेल्या देशांपैकी एक असलेल्या भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 97.31 टक्के इतका आहे. जगात इतर देशांच्या तुलनेत भारतात मृत्यूदरही अतिशय कमी आहे. आतापर्यंत भारतात 1 लाख 56 हजार 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही 1 लाख 45 हजार 634 सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोनाविषयी काळजी वाढवणारे वृत्त आहे. देश पुन्हा एकदा जगातील टॉप 15 देशांच्या यादीत सामील झाला आहे. कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत सध्या 15 व्या क्रमांकावर आला आहे. 30 जानेवारीला पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि आयर्लंडला मागे टाकत 17 व्या नंबरवर पोहोचले होते. लवकरच जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या यादीमधून भारत बाहेर पडू शकतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सक्रिय रुग्ण वाढल्यामुळे भारत आता पुन्हा जगातील सर्वात संक्रमित देशांमध्ये सामील झाला आहे.
अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन ‘टॉप 3’मध्ये
सक्रिय रुग्णांमध्ये अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. येथे सध्या 92 लाखांपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. फ्रान्समध्ये 32 लाख आणि ब्रिटनमध्ये 16 लाखांपेक्षा जास्त सक्रिय रुग्ण आहेत. या व्यतिरिक्त या यादीमध्ये ब्राझील, बेल्जियम, स्पेन, इटली, रशिया, मेक्सिको, पोलँड, आयर्लंड, इंडोनेशिया, अर्जेंटिना आणि भारताचाही समावेश आहे.