ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट पहायला मिळत आहे. शुक्रवारी देशात 1 लाख 20 हजार 529 नव्या संक्रमितांची नोंद झाली असून, मागील 59 दिवसातील हा सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 6 एप्रिलला 1 लाख 15 हजार संक्रमित रुग्ण आढळले होते. मागील 24 तासात 1 लाख 97 हजार 894 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 3380 रुग्ण दगावले.
देशात आतापर्यंत 2 कोटी 86 लाख 94 हजार 879 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 2 कोटी 67 लाख 95 हजार 549 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. सध्या 15 लाख 55 हजार 248 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 3 लाख 44 हजार 082 रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत.
आतापर्यंत देशातील 22 कोटी 78 लाख 60 हजार 317 नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. शुक्रवारी देशात 20 लाख 84 हजार 421 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.