कोरानाविरोधातील लढाई एकजुटीने जिंकण्याचा निर्धार
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना विषाणूविरुद्ध सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत 50 टक्क्मयांहून अधिक लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. देशातील निम्म्या लोकांनी कोविड-19 लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवारी दिली. 50 टक्क्मयांहून अधिक पात्र लाभार्थींचे पूर्णपणे लसीकरण झाल्याचा क्षण अभिमानास्पद असून कोविड-19 विरुद्धची लढाई आम्ही एकजुटीने जिंकणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोविड-19 लसीचे 127 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी 47.71 कोटी लोकांना दोन्ही डोस देण्यात आले असून 79.90 कोटी लोकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. शनिवारी दिवसभरात देशभरात लसीचे 1 कोटी 4 लाख डोस देण्यात आले. यामध्ये दुसरा डोस मिळालेल्या लोकांची संख्या 75 लाख 12 हजार इतकी होती. सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये दररोज सरासरी 59.32 लाख डोस दिले जात होते. तर मे महिन्यात दररोज सरासरी 19.69 लाख डोस दिले जात होते.
देशात ‘हर घर दस्तक’ मोहीम जोरात सुरू आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठत असून त्याला दिवसेंदिवस अधिक यश मिळत असल्याचे ट्विट केंद्रीय आरोग्यमंत्री मांडविया यांनी केले आहे.
राज्यांकडे 21.13 कोटीपेक्षा जास्त डोस शिल्लक
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीचे 138 कोटीहून अधिक डोस दिले आहेत. यामध्ये 21.13 कोटी अतिरिक्त आणि न वापरलेले डोस समाविष्ट असल्याचे मांडविया यांनी रविवारी स्पष्ट केले.
बिहारच्या ‘अपडेट’मुळे मृतांच्या संख्येत वाढ
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशात कोविड-19 चे 8,895 नवीन रुग्ण आढळले. यानंतर, एकूण संक्रमित लोकांची संख्या 3 कोटी 46 लाख 33 हजार 255 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय प्रकरणांची संख्या 99 हजार 155 वर आली आहे. देशात कोविड-19 संसर्गामुळे आतापर्यंत 4 लाख 73 हजार 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार दिवसभरातील मृतांचा आकडा 2,796 इतका असून यामध्ये बिहारमध्ये 2,426 जुन्या मृत्यूंची भर पडली आहे. बिहारने मागील आकडेवारी अपडेट केल्यामुळे देशातील दिवसभरातील एकंदर मृतांमध्ये मोठी वाढ झालेली दिसत आहे.
हिमाचल प्रदेश पुन्हा लसीकरणात ‘टॉप’
दरम्यान, देशात आतापर्यंत 127 कोटी नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असताना हिमाचल प्रदेशच्या नावे एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. राज्यातील सर्व प्रौढ नागरिकांना कोरोनाची लस देणारे हिमाचल प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. राज्यातील सरकारी सूत्रांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सर्वप्रथम पहिला डोस देण्याचा विक्रमही हिमाचल प्रदेशच्या नावेच आहे. राज्यातील एकूण 53 लाख 86 हजार 393 प्रौढ नागरिकांना कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात हिमाचल प्रदेशने त्या राज्यातील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला होता. आता एम्सकडून या राज्याचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.