जानेवारी महिन्यातील कामगिरीचा समावेश
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
देशामध्ये सेवा क्षेत्राची गती जानेवारी महिन्यात मंदावली असल्याचे पहावयास मिळाले आहे. कोरोना महामारी वाढल्याच्या दरम्यान नवीन व्यवसायांमध्येही संथपणे वृद्धी राहिली आहे, अशी माहिती एका मासिक सर्वेमधून समोर आली आहे.
जानेवारीमध्ये मासिक आधारावर घटून पीएमआय निर्देशांक 51.5 वर राहिला आहे, जो डिसेंबर महिन्यात 55.5 राहिला होता. मागील सहा महिन्यातील विस्तारात हा सर्वात कमी दर राहिल्याचे संकेत समोर आले आहेत.
सलग सहा महिन्यामध्ये सेवा क्षेत्राच्या उत्पादनात विस्तार पाहिल्यास यामध्ये पर्चेजिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) 50 च्या वर जात तेजी दर्शवत असतो, तर तो जेव्हा 50 अंकांच्या खाली जातो तेव्हा तो घसरणीत राहिल्याचे संकेत देतो. सर्वेक्षणात विविध घडामोडींचा प्रभाव राहिलेला आहे.
आयएचएस मार्किटच्या इकॉनॉमिक्स असोसिएट्स संचालक पॉलिएना डि लीमा यांनी म्हटले आहे, की महामारी वाढल्याने आणि प्रतिबंध पुन्हा लावण्यात आल्यामुळे सेवा क्षेत्राच्या विकासावर नकारात्मक प्रभाव पडला आहे.