राहुल गांधींकडून मोदी सरकार लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. या संकटकाळातही सेंट्रल विस्टा प्रकल्पाचे काम सुरू ठेवल्याबद्दल राहुल यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकल्पाच्या अंतर्गत निर्माण होणाऱया पतंप्रधान निवासस्थानाप्रकरणी राहुल यांनी शरसंधान केले आहे. देशाला पंतप्रधानांचे निवासस्थान नको, तर श्वास हवा आहे असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारला सातत्याने लक्ष्य केले आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे 13 एकर जमिनीवर त्रिकोणी आकारातील नवे संसद भवन उभारले जाणार आहे. या प्रकल्पाचा एक हिस्सा पुढील वर्षी डिसेंबरमध्ये तयार होणार आहे. यांतर्गत पंतप्रधान निवासस्थान आणि उपराष्ट्रपती भवन निर्माण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाकरता मोदी सरकार आग्रही राहिले आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटातही या प्रकल्पाचे काम रोखण्यात आलेले नाही. सेंट्रल विस्टा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 971 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचा अनुमान आहे. निर्मिती कार्याची देखरेख लोकसभा सचिवालय, आवास तसेच शहरी विकास मंत्रालय आणि सीपीडब्ल्यूडी, एनडीएमसी आणि आर्किटेक्ट तसेच डिझायनरांकडे आहे.