राजधानी दिल्लीला प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने सोमवारी मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये देशातील पहिला स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे. हा टॉवर सोमवारपासून कार्यान्वित झाला आहे.
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि दिल्लीची हवा स्वच्छ ठेवण्याकरता देशात पहिल्यांदाच स्मॉग टॉवर उभारण्यात आला आहे. हा टॉवर 24 मीटर उंचीचा असून तो 1 किलोमीटरच्या परिघातील हवा स्वच्छ करणार आहे.
हा स्मॉग टॉवर प्रदूषित हवा शोषून घेत स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे. सुमारे एक किलोमीटरच्या परिसरातील प्रदूषित हवा शोषून घेत स्वच्छ हवा वातावरणात सोडणार आहे. स्मॉग टॉवर स्वच्छ हवा वातावरणात 10 मीटर उंचीवर सोडणार आहे. या स्मॉग टॉवरच्या प्रभावीपणाचा अभ्यास तज्ञांकडून करण्यात येणार आहे. सकारात्मक निष्कर्ष मिळाल्यास दिल्लीच्या अन्य प्रदूषित भागांमध्ये असाच टॉवर उभारला जाईल.
स्मॉग टॉवर प्रत्येक सेकंदाला 1 हजार क्यूबिक मीटर हवा स्वच्छ करणार आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी कमी करण्यास हातभार लागणार आहे. अशाप्रकारचे टॉवर चीनमधील अनेक शहरांमध्ये उभारण्यात आले आहेत. तेथे या टॉवरची मोठी उपयुक्तता दिसून आली आहे.