हिजबुल प्रमुख सलाउद्दीनचे दोन्ही पुत्र शासकीय नोकरीतून बडतर्फ – एकूण 11 कर्मचाऱ्यांवर कारवाई
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीर प्रशासनाने शनिवारी अत्यंत मोठा निर्णय घेत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. प्रशासनाने एकाचवेळी 11 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. या बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचे संस्थापक सैयद सलाउद्दीनचे दोन्ही पुत्र सामील आहेत. देशाशी द्रोह करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशी धडक कारवाई अलिकडच्या वर्षांमध्ये प्रथमच दिसून आली आहे.
सलाउद्दीन हा काश्मीरचा रहिवासी असला तरीही सध्या तो पाकव्याप्त काश्मीरमधून हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करत आहे. तसेच तो युनायटेड जिहाद कौन्सिलचाही प्रमुख आहे. ही संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांनी मिळून तयार केली आहे.
दहशतवाद्यांना पुरवायचे माहिती
बडतर्फ कर्मचाऱ्यांमध्ये 4 अनंतनागमधील, 3 बडगामचे, बारामुल्ला अन् श्रीनगर, पुलवामा आणि कुपवाडा येथील प्रत्येकी एक कर्मचारी सामील आहे. या आरोपींमध्ये 4 शिक्षण विभागात, 2 पोलीस कॉन्स्टेबल, कृषी, कौशल्यविकास, वीज, स्कीम्स आणि आरोग्य विभागाचा प्रत्येकी एक कर्मचारी आहे. हे कर्मचारी दहशतवाद्यांना शासनासंबंधी गुप्त माहिती पुरवत होते, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनाशी संबंधित प्रकरणांच्या चौकशीसाठी नियुक्त समितीने स्वतःच्या दुसऱ्या बैठकीत 3 तर चौथ्या बैठकीत 8 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिफारस केली होती.
टेरर फंडिंगमध्ये हात
चौथ्या बैठकीत 8 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली होती, यात 2 कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. पोलीस म्हणून काम करताना ते दहशतवाद्यांना माहितीसह रसदही पुरवत होते. कॉन्स्टेबल अब्दुल राशिद शिगन हा सुरक्षा दलांवरील हल्ल्यातही सामील होता. मोस्ट वाँटेड दहशतवादी आणि हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सैयद सलाउद्दीनचे पुत्र सैयद अहमद शकील आणि शाहिद यूसुफ हे टेरर फंडिंगमध्ये (दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा) सामील होते. एनआयएची दोघांवरही करडी नजर होती. हिजबुलसाठी ते हवालाद्वारे रक्कम जमवणे आणि हस्तांतरित करण्याच्या कार्यात ते सामील असल्याचे आढळून आले आहे.
हिजबुलचा हस्तक
दहशतवादाशी संबंध बाळगल्याप्रकरणी नाज याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. तो आरोग्य विभागात कार्यरत होता. हिजबुल मुजाहिदीनचा ओव्हरग्राउंड वर्कर असण्यासह दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग होता. नाजने स्वतःच्या घरात दोन वाँटेड दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
2 शिक्षकांवरही कारवाई
समितीच्या दुसऱ्या बैठकीत बडतर्फीची शिफारस झालेल्या 3 कर्मचाऱयांमध्ये आयटीआय कुपवाडा येथील एक ऑर्डली सामील आहे. तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा ओव्हरग्राउंड वर्कर होता. सुरक्षा दलांच्या वाहतुकीशी संबंधित माहिती तो दहशतवाद्यांना पुरवत होता. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे कामही तो करत होता. याचबरोबर अनंतनाग जिल्ह्यातील दोन शिक्षक जमात-इस्लामी आणि दुख्तारन-ए-मिल्लत या फुटिरवादी संघटनेच्या विचारसरणीचे समर्थन करणे आणि देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याचे आढळून आले आहे.
वीज निरीक्षकाकडून तस्करी
वीज विभागाचा एक निरीक्षक शाहीन अहमद लोण हा हिजबुल मुजाहिदीनसाठी शस्त्रास्त्रांची तस्करी आणि वाहतूक करत होता. मागील वर्षी जानेवारीत श्रीनगर-जम्मू महामार्गावर दोन दहशतवाद्यांसोबत शस्त्रास्त्र, दारूगोळा आणि स्फोटके नेण्याच्या कृत्यात तो सामील होता. तर शिक्षण विभागाचे कर्मचारी जब्बार अहमद पारे आणि निसार अहमद तांत्रे पाकिस्तानपुरस्कृत फुटिरवादी कटाला हातभार लावण्यात सामील होते. दोघेही जमात-ए-इस्लामीशी संबंधित आहेत.