दस्त नोंदणीसाठी मागितली 25 हजाराची लाच
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर खरेदी दस्ताची नोंद घालण्याकरिता 25 हजार रुपयाची लाच घेताना देशिंग (ता. कवठेमहांकाळ) येथील तलाठी सचिन रघुनाथ पाटील यांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी (11) दुपारच्या सुमारास झाली.
अधिक माहिती अशी, तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उतायावर खरेदी दस्ताची नोंद घेण्यासाठी तलाठी सचिन पाटील यांनी तक्रारदाराकडे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत विभागाला दिली. विभागाने दिलेल्या तक्रारीचे पडताळणी करत तलाठी सचिन पाटील यांनी खरेदी दस्त नोंदणीसाठी 30 हजारांच्या लाचेची मागणी करून चर्चेअंती 25 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे तसेच कोतवाल आनंदा पाटील यांनी तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदार यांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले होते.
सोमवारी (11) रोजी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱयांनी तलाठी कार्यालयाजवळ सापळा लावत लोकसेवक तलाठी सचिन रघुनाथ पाटील (38 रा. मिरज मुळगाव एरंडोली) यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लोकसेवक कोतवाल आनंदा पाटील (रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ) यांनी तलाठी सचिन पाटील यांना लाच देण्यासाठी तक्रारदारांना प्रोत्साहन केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. कवठेमहांकाळ पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सूरज घाटगे, पोलीस अंमलदार अविनाश सागर, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, सलीम मकानदार, राधिका माने, सीमा माने, चालक बाळासाहेब पवार यांनी केली.