प्रतिनिधी/ बेळगाव
भारतीय सैन्य दलात दाखल होण्यासाठी परिसरातील तरुण धडपडताहेत. देशसेवेचे व्रत उराशी बाळगून अनेक तरुण सैन्यात भरती होत असतात. पण देसूरसारख्या ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या जिद्दीच्या जोरावर भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला. खडतर चाचणी देऊन थेट लेफ्टनंटपदी त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुण मोठे यश मिळवू शकतात हे त्याने दाखवून दिले आहे.
मूळचे दड्डी (ता. हुक्केरी) येथील शुभांगी व विलास रेडेकर यांचे चिरंजीव तेजस रेडेकर यांची भारतीय लष्करात अधिकारपदी निवड झाली आहे. सध्या देसूर येथे दहा वर्षांपासून स्थायिक असलेले तेजस यांचे शालेय शिक्षण व्ही. एम. शानभाग शाळेत झाले. त्यानंतर जीएसएस कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी घेऊन त्यांनी सेना दलात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.
तेजस यांची युपीएसई (युनियन पब्लिक सर्व्हिसेस), सीडीएस (कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस) या परीक्षेनंतर एसएसबी (सिर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड) या पाच दिवसांच्या मुलाखतीतून निवड होऊन ऑल इंडिया रँकिंगमध्ये 95 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन लेफ्टनंट या लष्करी अधिकारी पदावर रुजू होण्यासाठी ते येत्या डिसेंबर 2020 पासून चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी (ओटीए चेन्नई) येथे रुजू होणार आहेत. या त्यांच्या यशाबद्दल देसूर व दड्डी परिसरात कौतुक होत आहे.