उपाध्यक्षपदी स्नेहा कुंभार : आरक्षित जागेमुळे अध्यक्ष निवड बिनविरोध
प्रतिनिधी / बेळगाव
देसूर ग्राम पंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवडणूक बुधवारी पार पडली. देसूर ग्राम पंचायतीवर अध्यक्ष म्हणून लक्ष्मी देवाप्पा पिरनवाडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदे स्नेहा शंकर कुंभार यांनी बाजी मारली आहे. या दोन्ही विजयी उमेदवारांचे अभिनंदन जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केले.
सकाळी 11 वाजता निवडणुकीला सुरुवात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून प्रवीण महिंद्रकर, पीडीओ सुचेता बेनकनहळ्ळी या उपस्थित होत्या. अध्यक्षपद हे मागासवर्गीय परिशिष्ट जमातीसाठी आरक्षित होते. एकच उमेदवार पात्र असल्यामुळे लक्ष्मी देवाप्पा पिरनवाडी यांनी अर्ज दाखल केल्यानंतर त्या बिनविरोध निवडल्या गेल्या. उपाध्यक्षपद महिला अ वर्गासाठी आरक्षित असल्यामुळे निकिता निलेश सुतार आणि स्नेहा शंकर कुंभार यांनी अर्ज दाखल केला होता.
विजयी उमेदवारांचे अभिनंदन
15 सदस्यांपैकी निकिता सुतार यांना 6 मते पडली तर स्नेहा शंकर कुंभार यांना 9 मते मिळाली. त्यामुळे स्नेहा कुंभार या विजयी झाल्या. त्यानंतर विजयी जल्लोष करण्यात आला. विजयी उमेदवारांचे सर्व सदस्य व अधिकाऱयांनी अभिनंदन केले.
यावेळी सदस्य गणपती कृष्णा पाटील, सतीश रामजी चक्हाण, संतोष मरगाळे, संकेत पाटील, विनोद सुतार, भरमा सुतार, रावजी ऊर्फ पंकज जोतिबा घाडी, कविता गुरव, विद्या मनवाडकर, लक्ष्मी पाटील, निकिता निलेश सुतार, शोभा नंदिहळ्ळी, काशव्वा कांबळे हे उपस्थित होते. यावेळी ग्रा. पं. चे सचिव ईश्वर गुरव यांनी सर्वांचे आभार मानले.