दिवसभरात 38 हजार 303 रुग्णांना डिस्चार्ज : 431 जणांचा मृत्यू
गेल्या सहा दिवसांतील नवे कोरोनाबाधित
- 10 सप्टेंबर : 33,376
- 11 सप्टेंबर : 28,591
- 12 सप्टेंबर : 27,254
- 13 सप्टेंबर : 25,404
- 14 सप्टेंबर : 27,176
- 15 सप्टेंबर : 30,570
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहेत. चार दिवसांनंतर पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30 हजार 570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 38 हजार 303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 33 लाख 47 हजार 325 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 लाख 43 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 25 लाख 60 हजार 474 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 3 लाख 42 हजार 923 इतकी आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरू असतानाच देशात आतापर्यंत 76 कोटी 57 लाख 17 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत.