40 लाखांचा ऐवज जप्त : कॅम्प पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोडय़ा वाढल्या आहेत. कॅम्प पोलिसांनी कोल्हापूर जिह्यातील एका जोडगोळीला अटक करुन तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केले आहेत. चोरीसाठी ही जोडगोळी गुगल मॅपचा वापर करत होती, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. चार घरफोडय़ांचा तपास लागला असून कोल्हापूर, पुण्यातही या प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे.
गुन्हे तपास व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांनी सोमवारी सायंकाळी ही माहिती दिली आहे. कॅम्पचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक डी. संतोषकुमार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. डुग, हवालदार बी. बी. गौडर, ए. के. शिंत्रे, एम. ए. पाटील, बी. एम. नरगुंद, एच. एस. तळवार, यु. एम. थैकार, ए. एम. पाटील आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.
प्रशांत काशिनाथ करोशी (वय 35, रा. इस्पुर्ली, ता. करवीर, जि. कोल्हापूर), अविनाश शिवाजी अडावकर (वय 28, रा. धामणे, ता. आजरा, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आंतरराज्य गुन्हेगारांची नावे आहेत. या जोडगोळीने नक्षत्र कॉलनी, लक्ष्मी टेकडी प्रकरणात एकूण 4 घरफोडय़ा गेल्याची कबुली दिली असून त्यांनी आणखी कोठे चोऱया, घरफोडय़ा केल्या आहेत याचा तपास करण्यात येत आहे.
पोलिसांनी सुमारे 28 लाख 8 हजार रुपये किंमतीचे 500 ग्रॅमहून अधिक सोन्याचे दागिने, 11 लाख 50 हजार रुपये किंमतीचे केए 22 एमबी 3104 क्रमांकाची मारुती सुजुकी बलेनो कार असे एकूण 40 लाखांचा ऐवज जप्त केला आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी या जोडगोळीला अटक करुन मोठय़ा प्रमाणात ऐवज जप्त करणाऱया पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.
चोरीसाठी ही जोडगोळी तंत्रज्ञानाचाही वापर करीत होती, अशी माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे. डिसेंबर 2017 पासून आतापर्यंत एका कॅम्प पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी एकूण चार गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूर, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध शहरांतही या जोडगोळीने घरफोडय़ा केल्या असून महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने कॅम्प पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.