वेगवेगळय़ा ठिकाणी चोरलेली 10 वाहने जप्त : कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल
प्रतिनिधी /बेळगाव
दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करुन त्यांच्या जवळून साडेचार लाख रुपये किमतीच्या 10 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे.
प्रसाद अशोक पाटील (वय 24, रा. राजारामनगर-उद्यमबाग), अक्षय अशोक तंडाले उर्फ तांदळे (वय 22, रा. येळ्ळूर) अशी अटक करण्यात आलेल्या जोडगोळीची नावे आहेत.
गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी, महेश पाटील, बी. एम. नरगुंद, बी. एस. रुद्रापूर, श्रीधर तळवार, ए. बी. घट्टद आदींनी शुक्रवारी सकाळी ही कारवाई केली आहे.
प्रसाद व अक्षय या जोडगोळीने वेगवेगळय़ा ठिकाणी चोरलेली दहा वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या दोघा जणांवर कॅम्प पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस आयुक्त डॉ. के. एच. त्यागराजन यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे. या जोडगोळीने आणखी कोठे वाहने चोरली आहेत का? याची चौकशी करण्यात येत आहे.