संशयिताने दोन चॉपरने केले दोघांवर असंख्य वार
प्रतिनिधी/ फोंडा
सुपर मार्केट-फोंडा येथील कामत रेसिडेन्सीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दोघा बहिणींचा धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केल्याचा खळबजनक प्रकार काल शनिवारी दुपारी उघडकीस आला. मंगला तुळशीदास कामत (76) व जीवन क्यंकटेश कामत (68 निवृत्त नर्स) अशी दोन्ही मृत बहिणींची नावे आहेत. सदर प्रकार काल शनिवारी सकाळी 8 ते 10 वा. च्या दरम्यान घडल्याचा प्राथमिक अंदाज फोंडा पोलिसांनी वर्तविला आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुपर मार्केट येथील सारस्वत बँकेच्यामागे कामत रेसिडेन्सीत कामत कुटूंबियांचे तीन फ्लॅट आहेत. त्यापैकी पहिल्या मजल्यावरील फ्लॅटात किचनच्या खोलीत हा प्रकार घडला. या फ्लॅटात दोघी वृद्ध बहिणी राहत होत्या. तसेच दुसऱया मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रीतेश आपली पत्नी व मुलीसह राहतो. सदर घटनेवेळी फ्लॅटमध्ये दोघी बहिणीच होत्या. जीवन कामत ही निवृत्त नर्स असून मंगला ही तिची मोठी बहीण आहे. तिचा पती 2004 साली वारल्यानंतर त्या एकत्र फ्लॅटमध्ये राहत होत्या. दोन धारदार चॉपरने दोघा वृद्धांचा निर्घृण खून करून दुर्दैवी अंत करण्यात आला.
खुनाचे कारण गुलदस्त्यात
खून नेमका कोणत्या उद्देशाने केला यावर प्रश्नचिन्ह आहे. सदर प्रकार घडला तेव्हा दोन्ही पाळीव कुत्रे घरात बांधले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कुणाची एन्ट्री झाल्यानंतर भुंकण्याच्या आवाजावरूनही दुसऱया फ्लॅटमधून कोणी का बाहेर आले नाही याबाबतही प्रश्नचिन्ह आहे. घरातील बेडरूम, देवरूम, हॉलमधील सर्व वस्तू व्यवस्थित असून केवळ किचनमध्ये झटापटी झालेल्या आहेत. किचन पूर्णतः रक्ताच्या थारोळयात व भिंतीही रक्ताने माखलेल्या आहेत. दोन्ही वृद्धांच्या डोक्यावर धारदार चॉपरने वार करून हा खून करण्यात आल्याचा संशय फोंडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तसेच घटनेच्या अगोदर मयत वृद्धेच्या मोबाईलवर कोणी संपर्क केला या दिशेने तपास सुरू आहे.
शहराच्या मध्यवर्ती, पोलीस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावर खून
सुपर मार्केट येथील सारस्वत बँकेच्यामागे कामत रेसिडेन्सीत जाण्याचा मार्ग आहे. हॉटेलातील सीसीटीव्ही व बँकेचे सीसीटीव्ही फुटेज खुनाचे गूढ उकलण्यासाठी महत्त्वाचा धागेदोरे ठरणार आहेत. मागील पंचवीस वर्षापासून दोघी बहिणी गुण्यागोविंदाने राहत होती. मंगला कामत यांना दोन मुलगे असा परिवार आहे. त्यापैकी प्रीतेश हा सकाळी ढवळी येथील मामाच्या घरातून आपल्या आई व मावशीसाठी दूध घेऊन येणे हा त्याचा नित्यक्रम असायचा. नेहमीप्रमाणे प्रीतेश ढवळी येथून दूध घेऊन आल्यानंतर फ्लॅटमध्ये डोकावून मावशीला आवाज दिल्यानंतर कोणीच प्रतिसाद न दिल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला खाली मावशीच्या फ्लॅटमध्ये पाठविले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. रक्ताच्या थोराळयात पाहिल्यानंतर प्रीतेशने ढवळी येथील आपल्या मामाला व इतरांना संपर्क केला. त्यानंतर 108 रुग्णवाहिकेला फोन केल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास पोलिसांना कळविण्यात आले
कुणाकडेच वैरत्व नाही
जीवन व मंगला या दोघी बहिणी मूळ ढवळी येथील आहेत. गोकुळदास कामत यांच्या एकूण सहा भावंडापैकी दोन. जीवन ही गोमेकॉत नर्स होती व ती अविवाहीत होती. मंगला हिचे मडकई येथे भाच्याकडे लग्न करून दिले. मंगला हिचा पती 2004 साली वारला असून त्यानंतर ती आपल्या मोठय़ा मुलांसमवेत कामत रेसिंडेन्सी येथे राहत आहे. तर धाकटा मुलगा रितेश कामत आपल्या पत्नी व मुलासमवेत मडकई येथे राहत आहे. मोठी बहीण मंगला हिला मधुमेहाचा त्रास आहे तरीही दोघी बहिणी गुण्यागोविंदाने एकमेकाच्या सुखदुःखात एकसाथ सहली, प्रवास करीत जीवन आनंदात व्यतित करीत होत्या. नेहमी हसतमुख असणाऱया आपल्या बहिणीची कुणाकडेच वैरत्व नसल्याचे त्याचे भाऊ गोकुळदास कामत यांनी सांगितले.
रात्री उशिरापर्यंत तपासकार्य
तब्बल पाच तासानंतर फॉरेन्सिक टीम श्वानपथकासह घटनास्थळावर दाखल झाली. त्यानंतर श्वानाने घटनास्थळावरून सरळ येथील कॅफे भोसलेच्या बाजूने धाव घेतली होती. सीसीटीव्हीच्या तपासानुसार फ्लॅटमध्ये कोण येऊन गेलेत का, याची कसून चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग, उपअधीक्षक उदय परब यांनी घटनास्थळी पाहणी केली असून घरातील लोकांच्या जबान्या नोंद केल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत तापासकामाचे काम सुरू होते, त्यानंतर मृतदेह शवचिकित्सेसाठी उशिरा रात्री नेण्यात आला. फोंडा पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
फोंडा पोलीस स्थानक सीसीटीव्ही कॅमेऱयाखाली, शहरात एकही नाही गजबजलेल्या फोंडा शहरात एकही ठिकाणी सीसीटीव्ही कार्यान्वित नाहीत. चारही बाजूने वेढलेल्या निवासी गाळय़ातही सीसीटीव्ही कॅमेऱयाविषयी नागरिक अजून जागरूक झालेले नाही. मात्र फोंडा पोलीस स्थानकात चौहूबाजूनी वीस बावीस सीसीटीव्ही कॅमेरे हल्लीच नव्याने कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. पोलिसांना खून व चोरीच्या तपासासाठी खासगी हॉटेल, बॅकाच्या सीसीटीव्हीवर अवलंबून राहावे लागत आहे.