बनावट ओळखपत्र दाखवून राहिले होते
दोनापावला येथील ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये बनावट ओळखपत्र दाखवून राहिलेल्या दोन संशयितांना पणजी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत ताज कन्वेन्शन सेंटरच्या अधिकाऱयांनी तक्रार दाखल केली होती. दोन्ही संशयित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये सोनीया दुहान, श्रेय कोठीयाल (दोन्ही हरियाणा येथील आहेत) यांचा समावेश आहे. संशयित शुक्रवारी दुपारी ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये राहायला आले होते. रात्रीच्यावेळी संशयितांच्या हालचाली संशयास्पद वाटायला लागल्याने त्यांच्या ओळखपत्राची तपासणी करण्यात आली. ओळखपत्र बनावट असल्याचे समजताच तेथील अधिकाऱयांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्वरित कारवाई करून संशयितांना भादंसं 419 व 420 कलमाखाली अटक केली.
संशयित बनावट ओळखपत्र दाखवून ज्या ठिकाणी राहिले होते त्याच ताज कन्वेन्शन सेंटरमध्ये महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच इतर बंडखोर आमदारही राहिले होते. त्यामुळे संशयितांबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. शनिवारी सकाळापासून पोलीस खात्याच्या विशेष विभागाचे अधीक्षक, उपअधीक्षक व निरीक्षक यांनी त्यांची कसून उलटतपासणी केली. उलटतपासणी दरम्यान संशयितांनी कोणती माहिती उघड केली ते समजू शकले नाही. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.