प्रतिनिधी / सांगली
रविवारी जिल्हय़ात दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षीय व्यक्ती आणि मिरज दत्त कॉलनीमधील 67 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. तर चौघे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्हय़ात सध्या उपचारातील रूग्णसंख्या 45 इतकी आहे.
दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह
जिल्हय़ात शनिवारी नऊ कोरोना बाधितांच्या संपर्कातील हाय रिस्क व्यक्तींना आयसोलेशनमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचे स्वॅबही घेण्यात आले होते. यातील रविवारी अनेकांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ाला थोडा दिलासा मिळाला आहे. तर मुंबईहून शिराळा तालुक्यातील मणदुर येथे आलेल्या 81 वर्षीय व्यक्तीचा आणि मिरज येथील मालगाव रोडवरील दत्त कॉलनीमधील 67 वर्षीय व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या दोनने वाढून ती 112 वर पोहोचली आहे.
चौघेजण कोरोनामुक्त
जिल्हय़ात रविवारी चौघेजण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये आटपाडी येथील 26 वर्षीय व्यक्ती, आटपाडी तालुक्यातील सोनरसिध्दनगर येथील 22 वर्षाची महिला, जांभुळणी येथील 55 वर्षीय व्यक्ती तर धारावी-मुंबईहून इस्लामपूर येथे आलेली 15 वर्षाची मुलगी असे चौघे कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना आता संस्था क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
दोघे व्हेंटीलेटरवर तर दोघांना ऑक्सिजनवर उपचार सुरू
जिल्हय़ात सध्या उपचारात असणाऱया 45 रूग्णांपैकी चौघांची प्रकृती नाजूक आहे. यामध्ये दोघांच्यावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये जत तालुक्यातील औंढी येथील 55 वर्षाची व्यक्ती आणि शिराळा तालुक्यातील खिरवडे येथील 56 वर्षीय व्यक्ती यांचा समावेश आहे. तर ऑक्सिजनवर उपचार सुरू असणाऱयामध्ये नांगोळे येथील 48 वर्षीय व्यक्ती आणि शिराळा तालुक्यातील मणदूर येथील 81 वर्षाच्या व्यक्तीचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली.