दोडामार्ग – वार्ताहर-
काल 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी दोडामार्ग तालुक्यात ठिकठिकाणी आयोजित झालेल्या एकूण 14 पैकी तेरा उपोषण मागे घेण्यात आलीत. उपोषणांशी संबंधित अधिकारी, आमदार, लोकप्रतिनिधी यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्याने ही उपोषण मागे घेण्यात आलीत. तर एक उपोषण आज सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत सूरु होते.
बहुचर्चित कळणे येथील ग्रामस्थांनी नुकसान भरपाईवरून तसेच मायनिंग कंपनी वरून छेडलेले उपोषण काल रात्री उशिरा आमदार दीपक केसरकर यांनी कळणेवासीयांच्या मागण्या पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले. दोडामार्ग नगरपंचायत मधील सक्शन व्हॅन, एलईडी लाईट तसेच अन्य विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडले होते. या उपोषणस्थळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी भेट दिली. त्यांनी राज्याच्या नगरविकास राज्यमंत्र्यांची चर्चा करत संपूर्ण माहिती दिली. तेव्हा या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.
[ बाळा नाईक व भाजप पदाधिकाऱ्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच ]
पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या दोन महत्वपूर्ण योजनांमधून दोडामार्ग तालुक्यातील गावागावात जे रस्ते करण्यात आले आहेत. त्यातील बऱ्याच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामांची चौकशी करण्याची मागणी करत पंचायत समिती सदस्य बाळा नाईक व भाजप पदाधिकारी यांनी येथील तहसीलदार कार्यलयासमोर कालपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. ते आज दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यन्त सुरूच होते. या रस्त्यांच्या कामांशी निगडित संबधित अधिकारी आज आले असता भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना व रस्त्यांची कामे केलेले ठेकेदारांना ठिकठिकाणी नेऊन स्पॉट पंचनामे करण्यास भाग पाडले.