वाहनाची हवा सोडण्याचाही प्रकार; पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप
वार्ताहर / दोडामार्ग:
दोडामार्गातील महिला मासे विक्रेती वेंगुर्ले उभादांडा येथे होलसेल मासळी खरेदीसाठी गेले असता तीच्या वाहनाची हवा काढून धमकी देण्याचा प्रकार वेंगुर्ले येथे घडला. तेथील पोलिसांनी या बाबत कानाडोळा केल्याचा आरोप सदर मासे विक्रेती राधिका गोविंद कासकर हिने रविवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत केला. या प्रकरणाची रितसर चौकशी करण्याची मागणीही सौ. कासकर हिने केली आहे.
वेंगुर्ले उभादांडा येथे घडलेल्या या प्रकाराची अधिक माहिती देताना सौ. कासकर म्हणाल्या, दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडून मासे वाहतूक व विक्रीचा रितसर परवाना, कागदपत्रे वगैरे घेऊनच आपण नेहमीप्रमाणे उभादांडा येथे गेले होते. तेथून जवळ असलेल्या मासे खरेदी केंद्रानजीक माझे वाहन नेले नाही. मात्र, अन्य चार ते पाच वाहने केंद्रानजीक गेली होती. सदर ठिकाणी नेहमीप्रमाणे होलसेल मासे खरेदी करत असता आपल्या वाहन चालकाचा फोन आला. काही व्यक्तींनी आपल्या वाहनातील हवा सोडून यापुढे येथे यायचे नाही, असे सांगत मारण्याची धमकी दिली. या बाबत तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्यात धाव घेतली, तेव्हा तीथे उपस्थित एका महिला पोलीस कर्मचाऱयाने तक्रार घेण्यास नकार दिला. वेंगुर्ले येथे होलसेल मासळी खरेदीसाठी दररोज अनेक ठिकाणांहुन अनेक वाहने येत असतात. मात्र, केवळ आपल्यालाच मुद्दामहून टार्गेट केल्याचा आरोप सौ. कासकर यांनी केला आहे. नजीकच्या पोलीस ठाण्यात आपण या संदर्भात माहिती व तक्रार देण्यासाठी गेले असता तेथील पोलिसांकडून अपमास्पद वागणूक मिळाली. या संदर्भात वरिष्ठांनी योग्य ती दखल घेऊन आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी सौ. कासकर यांनी केली आहे.