तालुका कार्यकारणी बरखास्तीचा निर्णय; जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांची दै. ‘तरुण भारत’ ला माहिती
दोडामार्ग – वार्ताहर-
कसई – दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेनेचा जो पराभव झाला त्याची वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्यात आली असुन तालुकाप्रमुखांसह संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर यांनी दिली. दूरध्वनी वरून संवाद साधत तरुण भारतला त्यांनी ही माहिती दिली.
कसई – दोडामार्ग नगरपंचायतींसाठी सतरा जागांसाठी असलेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये शिवसेनेला केवळ दोन जागा मिळाल्या. याबाबत तात्काळ वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्यात आली. दुधवडकर पुढे म्हणाले, जिह्यातील वैभववाडी, कुडाळ, देवगड या ठिकाणी शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले. दोडामार्गात सर्वोतोपरी प्रयत्न केले मात्र म्हणावे तसे यश मिळाले नाही. याला तालुका पदाधिकऱ्यांच्या काही चुकां जबाबदार आहेत. त्यामुळे तूर्त तालुका प्रमुखांसह संपूर्ण तालुक्याची कार्यकारणी बरखास्त करण्यात येत आहे. शिवाय पराभवाची कारणे कोणती आहेत ? अन्य कोण- कोण पदाधिकारी याला जबाबदार आहेत याचाही शोध घेतला जाऊन योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही दुधवडकर यांनी सांगितले. कुडाळ मध्ये सत्ता स्थापनेसाठी आपला दावा आहे तशी राष्ट्रीय काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलणी सुरू आहे. शिवाय वैभवाडीत समाधानकारक तर देवगड मध्ये खूपच चांगले यश शिवसेनेला मिळाले असेही त्यांनी सांगितले.