दोडामार्ग – वार्ताहर-
विजघर येथील दारूचा आयशर टेम्पो पकडून 24 तास उलटत नाही तोच दोडामार्ग बाजारपेठेतील भर गांधी चौकात एका स्विफ्ट डिझायर कार मधून 30 हजार 720 रुपयांची दारू जप्त केली. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या कारवाईमध्ये या कारमधून सांगली मधील दोघांना ताब्यात घेण्यात आले. दारूसहित 3 लाख 50 हजार रुपयांची कार जप्त करत एकूण 3 लाख 80 हजार 720 रुपयांचा एकूण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
काल मंगळवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास विजघर येथील चेक पोस्टवर दारूची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला होता. तर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास येथील गांधी चौकातील तिलारी- कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एक स्विफ्ट डिझायर कार अडवली व त्यातील 30 हजार 720 रुपयांची दारू जप्त केली. कारमधील प्रकाश बळीराम चव्हाण (वय 26) व प्रवीण मधुकर कांबळे( वय 25) दोघेही राहणार कुणीकोंनोंर, ता. जत, जिल्हा सांगली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिस स्वप्निल सखाराम पांगम यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (A)(E), 81, 83 या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या महिन्याभरात कालपर्यंत दोडामार्गात दारूची वाहतूक करणारी वाहने पोलिसांच्या जाळ्यात सापडत असून शहरमार्गे दररोज नेमकी किती दारू वाहतूक होत असेल याबाबत नागरिकांमधून तर्कवितर्क लढविले जात आहेत.