क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
गोवा रणजी क्रिकेट संघाचे प्रशिक्षक दोड्डा गणेशने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या 47 वर्षीय दोड्डा गणेशने आपला राजीनामा गोवा क्रिकेट संघटनेला सादर केला असून तो स्वीकारण्यातही आला आहे. त्याचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती जीसीएचे सचिव विपुल फडकेने दिली.
आरोग्यविषयक समस्येमुळे आपण सीनियर संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत असल्याचे दोड्डाने आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे. गेल्या रणजी क्रिकेट मोसमात दोड्डा गणेशचे गोव्याला प्लेट गटामधून एलीट गटात नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान राहिले होते. यासाठी जीसीएनेसुद्धा त्याचा करार यंदाही वाढविला होता.
हल्लीच इंदूरात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेतही त्याने प्रशिक्षण दिलेल्या गोव्याच्या संघाने चांगली कामगिरी केली होती व पाच सामन्यांतून तीन सामने जिंकले होते. सराव आणि सामन्यावेळी त्याची प्रकृती ठणठणीत राहत होती, मात्र या दौऱयावर रात्रीच्याच वेळी त्याची प्रकृती कित्येक वेळा बिघडली. आरोग्यविषयक समस्येमुळे अखेर दोड्डाने गोव्याच्या क्रिकेटला रामराम ठोकला. कडक शिस्तीचे तसेच क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफला नेहमीच गुंतवून ठेवणारे प्रशिक्षक म्हणून दोड्डा गणेश परिचित होते. त्यानी अचानक राजीनामा दिल्याने राज्यातील क्रिकेट वर्तुळ अचंबित झाले आहे.