वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात पार पडलेल्या जिल्हा परिषद (झेडपी) निवडणुकीचे निकाल अनेक ठिकाणी चकित करणारे आहेत. लखनौच्या मोहनलालगंज मतदारसंघातून विजयी होत दोनवेळा खासदार राहिलेल्या भाजप उमेदवार रीना चौधरी यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने त्यांच्यावर मात केली आहे.
लखनौमध्ये यंदा जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव आहे. याचमुळे भाजपने माजी खासदार रीना चौधरी यांना एका मतदारसंघात उमेदवारी दिली होती. रीना यांना अध्यक्षपद देण्याची योजना होती. पण सप पुरस्कृत पलक रावत यांनी चौधरी यांचा पराभव केला आहे.
विशेष बाब म्हणजे रीना चौधरी या मोहनलालगंज मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या तिकीटावर दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. उत्तरप्रदेशातील पूर्वांचल, अवध आणि मध्य उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाचे वरचष्मा दिसून आला आहे. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी आणि अयोध्येतही भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. तर पश्चिम उत्तरप्रदेशातही भाजपला फटका बसला आहे. अजित सिंग यांच्या रालोदने जाट समुदायांमधील स्वतःचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित केला आहे.