कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती नको : उच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्या कोणालाही गोव्यात प्रवेश देण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारने उच्च न्यायालयात सादर केली आहे. त्यांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये, असेही याचिका अर्जात म्हटले आहे. या प्रकरणी बुधवारी सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले. गोव्यातील पर्यटन पूर्ण क्षमतेने पूर्ववत सुरु करण्यासाठी सरकारने प्रयत्न चालवले असून सदर याचिका हा त्याचाच एक भाग आहे.
मुक्त पर्यटनासाठी आवश्यक
कोरोना व्यवस्थापनासाठी सरकारने नेमलेल्या तज्ञ समितीने दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना गोव्यात कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यास हरकत नाही अशी शिफारस सरकारला केली आहे. त्याचा संदर्भ याचिकेसोबत जोडण्यात आला असून ‘लिबरल टुरिझम’साठी म्हणजे मुक्त पर्यटनासाठी ते आवश्यक असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.
‘लिबरल टुरिझम’ म्हणजे काय?
याचिका दाखल करुन घेताना ‘लिबरल टुरिझम’ म्हणजे नेमके काय? अशी विचारणा न्यायालयाने केली असून त्याचे स्पष्टीकरण प्रतिज्ञापत्राच्या स्वरुपात देण्यास सांगितले आहे. याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवण्यत आली असून त्याचदिवशी प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे. गोव्यासाठी पर्यटन मुक्तपणे खुले करण्यासाठीच सरकारने वरील मागणीची याचिका सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले.