कोव्हिशिल्डचे 4200, कोव्हॅक्सिनचे 8000 : कोव्हिशिल्ड दुसऱया डोससाठी, कोव्हॅक्सिन ‘18 प्लस’साठी
- जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांची माहिती
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी आणखी 12 हजार 200 कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस प्राप्त झाले असून कोव्हिशिल्डचे 4200, तर कोव्हॅक्सिनचे 8000 डोस प्राप्त झाले आहेत. कोव्हिशिल्डची 70 टक्के लस दुसऱया डोससाठी वापरण्यात येणार आहे. मात्र कोव्हॅक्सिनचे डोस 18 ते 44 वर्ष वयोगटातील जनतेला दिली जाणार आहे. लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून आता प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.
कोरोना लसीकरण करण्यासाठी सध्या झुंबड उडत आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरणाचा जिल्हय़ाला किती पुरवठा होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. बुधवारी जिल्हय़ाला आणखी 12 हजार 200 डोस प्राप्त लस मिळण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस प्राप्त झाले आहेत. हे डोस राज्य शासनाकडून प्राप्त झाले असून हे डोस फक्त 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना द्यावेत, असे स्पष्ट आदेश राज्य शासनाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे 45 वर्षांवरील लोकांना हे डोस दिले जाणार नाहीत किंवा दुसऱया डोससाठी वापरता येणार नाहीत. 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहे. मात्र त्यांनी ऑनलाईन नोंदणी केल्यावरच लस दिली जाणार आहे.
कोव्हिशिल्डचे 4 हजार 200 डोस केंद्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत. हे डोस 45 वर्षांवरील वयोगटातील लाभार्थ्यांनाच देण्यात येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोव्हिशिल्ड डोस 18 ते 45 वर्षे वयोगटासाठी वापरता येणार नाही. तसेच प्राप्त डोसमधून 70 टक्के लस ही दुसऱया डोससाठी वापरण्यात येणार असून 30 टक्के लस ही पहिल्या डोससाठी वापरण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली.
दरम्यान जिल्हय़ाला कोव्हॅक्सिनचे आठ हजार डोस प्राप्त झाल्याने कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस आता मिळणार, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या आदेशानुसार कोव्हॅक्सिनचे सध्या प्राप्त झालेले आठ हजार डोस फक्त 18 ते 44 वर्षे वयोगटातीलच जनतेला दिले जाणार आहेत. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील जनतेला मात्र दुसऱया डोससाठी अजूनही वाट पाहवी लागणार आहे. दरम्यान कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या लोकांना दुसरा डोस देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे अतिरिक्त डोस देण्याची मागणी करण्यात आली असून कोव्हॅक्सिनचा डोस प्राप्त होताच दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.
जिल्हय़ात 18 ते 44 वर्ष वयोगटातील लोकांना तालुक्याच्या ठिकाणी लस दिली जात होती. आता मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातही लस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. जिल्हय़ाला प्राप्त झालेल्या एकूण 12 हजार 200 डोस लाभार्थ्यांना देण्याचे नियोजन करण्यात आले असून प्रत्येक लसीकरण केंदावर कोव्हॅक्सिनचे 160 डोस प्रत्येकी देण्यात आले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रे व ग्रामीण रुग्णालयात देण्यात आलेली कोव्हिशिल्ड लस पुढीलप्रमाणे आहे. वैभववाडी – 100, उंबर्डे – 100, ग्रामीण रुग्णालय, वैभववाडी – 130, खारेपाटण – 100, कासार्डे – 0, कनेडी – 100, फोंडा – 100, कळसुली – 100, वरवडे – 100, नांदगाव – 100, उपजिल्हा रुग्णालय, कणकवली – 200, पडेल-मोंड – 100, फणसगाव – 100, मिठबाव – 100, इळये – 0, शिरगाव – 100, ग्रामीण रुग्णालय देवगड – 130, आचरा – 100, मसुरे – 100, चौके – 0, गोळवण – 100, हिवाळे – 100, ग्रामीण रुग्णालय मालवण – 130, ग्रामीण रुग्णालय पेंडूर-कट्टा – 0, कडावल – 100, कसाल – 100, पणदूर – 100, हिर्लोक – 100, माणगाव – 0, वालावल – 100, जिल्हा रुग्णालय ओरोस – 300, ग्रामीण रुग्णालय कुडाळ – 100, परुळे – 0, आडेली – 0, तुळस – 100, रेडी – 0, उपजिल्हा रुग्णालय, शिरोडा – 100, ग्रामीण रुग्णालय, वेंगुर्ले – 100, मळेवाड – 100, सांगेली – 0, निरवडे – 100, आंबोली – 100, बांदा – 0, उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी – 200, भेडशी – 100, मोरगाव – 0, तळकट – 0, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग – 130.