हुबळीत राष्ट्रीय महामार्गावरील घटना :1 गंभीर
वार्ताहर /हुबळी
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर बुधवारी सायंकाळी झालेल्या वेगवेगळय़ा दोन अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. गब्बूर क्रॉसजवळ रिक्षाला ट्रकने जोराची धडक दिल्याने रिक्षामधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. श्रीनिवारस मारुती कलादगी (वय 46) आणि महमद हुसेनी इब्राहिमसाब मुल्ला (वय 56) अशी मृतांची नावे आहेत.
अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. तसेच रिक्षातील मृतदेह बाहेर काढताना सार्वजनिक आणि पोलिसांना बरेच परिश्रम घ्यावे लागले. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन घटनास्थळी सोडून पलायन केले होते. मात्र, स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दक्षिण वाहतूक पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
तारिहाळमध्ये दुचाकीस्वार ठार
येथील तारिहाळमध्ये दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बायपास रस्त्यावरून येणाऱया दुचाकीला समोरून आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीच्या मागे बसलेला युवक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी किम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.