प्रतिनिधी / मडगाव
मूळ परप्रांतिय व घटनेच्यावेळी गोव्यात असलेल्या दोन अल्पवयीन बहिणीकडे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आणि गेले सहा महिने फरार असलेला उत्तर प्रदेशातील एका आरापीला मडगाव पोलिसांनी अथक परिश्रमाने त्या राज्यात जाऊन जेरबंद केले आहे. सध्या मडगाव पोलिसांचे यासंबंधी कौतूक होत आहे.
मडगाव व उत्तर प्रदेशातील मुरादाबाद शहरातील अंतर अंदाजे 1900 किलोमीटर इतके आहे. आज शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस आरोपीला घेऊन मडगावला पोहोचण्याची शक्यता आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील पीडित युवती ही 15 वर्षाची असून या अल्पवयीन मुलीवर मुरादाबादा येथील रहिम खान (24) याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या मुलींची फरारी आई व तिचा प्रियकर उर्फ आरोपी रहीम खान उत्तर प्रदेशातील अमूक ठिकाणी असल्याची खबर मडगाव पोलिसांना मिळाल्यानंतर एक पोलीस पथक त्या राज्यातील मुरादाबाद येथे गेले होते.
त्या राज्यातील स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने मडगाव पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला भारतीय दंड संहितेच्या 276 कलमाखाली तसेच गोवा बाल कायद्याच्या 8 व्या कलमाखाली अटक केली. लग्नाचे आमीष दाखवून आरोपी रहीम खान याने या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आरोपी रहीम खानविरुद्ध मडगाव पोलीस स्थानकात तक्रारही नोंद करण्यात आलेली आहे. आरोपी रहीम खान व या मुलींची आई दोघेही फरार झाली होते. दोघांनाही जेरबंद करण्यात आले आहे.