शूटिंगसाठी घराबाहेर पडली होती बांगलादेशी अभिनेत्री – पोत्यात मिळाला मृतदेह : पती अटकेत
वृत्तसंस्था / ढाका
रविवारी बेपत्ता झालेली बांगलादेशी अभिनेत्री राइमा इस्लाम शिमूचा मृतदेह एका पोत्यात सापडला आहे. शिमूच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून ते पोत्यात भरून फेकण्यात आले होते. 35 वर्षीय अभिनेत्रीच्या मानेवर जखमेच्या खुणा होत्या. पोलिसांनी याप्रकरणी अभिनेत्रीचा पती आणि त्याच्या मित्रासह 6 जणांना ताब्यात घेतले आहे.
रायमा ही बांगलादेशची राजधानी ढाका येथे पती आणि दोन मुलांसह राहत होती. शिमू रविवारी सकाळी मावामध्ये चित्रिकरणासाठी घरातून बाहेर पडली होती. यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. यामुळे कुटुंबाकडून पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली होती. रायमाच्या मृतदेहाचे दोन तुकडे पूलानजीक सापडले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
मृतदेह मिळाल्यावर शिमूचा भाऊ शाहिदुल इस्लाम खोकॉनने तिचा पती सखावत अमीन नोबेलच्या विरोधात संशय व्यक्त केला. पती आणि त्याचा मित्र फरहादसह 6 जणांना शिमूच्या हत्येचे संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले. एक कारही जप्त करण्यात आली असून त्याच्या मागील सीटवर रक्ताचे डाग आढळून आल्याची माहिती ढाका जिल्हा पोलीस अधीक्षक मारुफ हुसैन सरदार यांनी दिली.