श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्हय़ात काडीपोरा येथे झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय लष्कराला यश आले. सदर दोन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे समजते. अनंतनागमधील काडीपोरा गावात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलीस व लष्कराने संयुक्तपणे काडीपोरा भागात शोधमोहीम सुरू केली. बुधवारी संध्याकाळी अंधार पडल्यानंतर घटनास्थळाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करून शोधमोहीम तात्पुरती थांबवली होती. गुरुवारी पहाटे पुन्हा शोधमोहीम सुरू केल्यानंतर दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.