श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहरातील झाकुरा भागात शनिवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि टीआरएफ या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. मृत दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख पटली असून त्याचे नाव इखलाक हजम असे आहे. अनंतनागच्या हसनपोरा येथे अलीकडेच झालेल्या एचसी अली मोहम्मद यांच्या हत्येच्या कटात त्याचा सहभाग होता.
भारतीय सुरक्षा दलाची जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली कारवाई वेगाने सुरू आहे. गेल्या आठवडय़ाभरात काश्मीरमध्ये तीन ठिकाणी मोठय़ा चकमकी झडल्या. 3 फेब्रुवारीला उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिह्यात पोलीस आणि लष्कराने केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-एöतोयबाच्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या ताब्यातून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला होता. बांदीपोरा येथील चंदरगीर हाजिन परिसरातून ही अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी जैशचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही खात्मा करण्यात आला होता.