कोरोनाचा आणखी एक बळी : जिल्हा रुग्णालयातील चार डॉक्टर पॉझिटिव्ह : काही खासगी डॉक्टरही कोरोना बाधित
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
गणेश चतुर्थी दिवशी विक्रमी संख्येने 130 आणि दुसऱया दिवशी रविवारी पाच असे दोन दिवसांत 135 पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हय़ात आढळल्याने खळबळ उडाली आहे. अजून एक धक्कादायक बाब म्हणजे कोरोनाचा सर्वत्र शिरकाव होऊ लागला असून जिल्हा रुग्णालयातील चार डॉक्टर पॉझिटिव्ह आले आहेत. जि. प. मधील आणखी काही अधिकारी, कर्मचारी आणि कणकवली व सावंतवाडीमधील काही खासगी डॉक्टरही पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्हय़ात झपाटय़ाने वाढत असलेल्या कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे.
जिल्हय़ात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 937 झाली आहे. तर कोरोना सक्रिय रुग्णसंख्या 413 झाली आहे. जिल्हय़ात आणखी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील 83 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे पंधराजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या दोन दिवसांत बरे झालेल्या 25 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
गणेशोत्सवासाठी जिल्हय़ाबाहेरून आलेल्या व्यक्तींपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर आता स्थानिक लोकांमध्ये सुद्धा कोरोनाचे संक्रमण वाढू लागले आहे. नगरपालिका, पोलीस, आरोग्य कर्मचारी, जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. रुग्ण वाढल्याने आठ कंटेंटमेंट झोन वाढविण्यात आले आहेत. एकूण 104 कंटेंटमेंट झोन करण्यात आले आहेत.
दोन दिवसात 135 पॉझिटिव्ह रुग्ण : वैभववाडी तालुका – गडमठ, नानिवडे, कुसुर प्रत्येकी एक, कोकिसरे तीन, वैभववाडी दोन. देवगड तालुका – नाडन, देवगड, तांबळडेग, ब्राह्मणदेवाडी प्रत्येकी एक आणि जामसंडे दोन. कणकवली तालुका – भिरवंडे, करुळ, वरवडे, नाटळ, जानवली प्रत्येकी एक, कलमठ दोन, खारेपाटण चार, कणकवली नऊ. मालवण तालुका – देवबाग, मेढा, आणि देवली प्रत्येकी एक. कुडाळ तालुका – ओरोस 19, माणगाव पाच, कुंभारवाडी पाच, सोनवडे तीन, कसाल, आंब्रड, पिंगुळी प्रत्येकी एक. वेंगुर्ले तालुका – वेंगुर्ले दहा, उभादांडा चार, होडावडे सात, तुळस तीन, मातोंड दोन, आडेली, शिरोडा, पेंडूर प्रत्येकी एक. सावंतवाडी तालुका – सावंतवाडी 18, माठेवाडा तीन, निरवडे दोन, बांदा, ओटवणे, आरोंदा, कोलगाव, माजगाव प्रत्येकी एक. दोडामार्ग तालुका – कसई दोडामार्ग दोन, पिकुळे, आंबेली, हेवाळे आणि दोडामार्ग प्रत्येकी एक.
एकूण अहवाल 11,495
पॉझिटिव्ह आलेले अहवाल 937
निगेटिव्ह आलेले अहवाल 10,325
प्रतीक्षेतील अहवाल 233
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण 413
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 15 (एक गोव्यातील)
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 509
अलगीकरणातील एकूण व्यक्ती 15,837
नागरी संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 4,197
2 मेपासून आतापर्यंत जिल्हय़ात दाखल व्यक्ती 2,01,108
सद्यस्थितीत सक्रिय कंटेनमेंट झोन 104