मृत्यू कोरोनामुळे नव्हे, तर अन्य आजारांमुळे – जिल्हाधिकाऱयांनी केले स्पष्ट
- आठवडाभरात आयसोलेशन वॉर्डमध्ये सहाजणांचा मृत्यू
- नागरिकांनी घाबरून जाऊ नये, जिल्हा प्रशासनाकडून आवाहन
- जिल्हय़ात आणखी 22 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात 800 बेडची व्यवस्था
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर ‘होम क्वारंटाईन’ असलेल्या एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन दिवसांत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी गेल्या आठवडाभरात आयसोलेशन वॉर्डमधील दोघांचा मृत्यू झाला होता. दरम्यान हे मृत्यू कोरोनामुळे नव्हे, तर अन्य आजारांमुळे झाले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये एकमेव कोरोनाचा रुग्ण सापडला होता. तो रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. मात्र जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून येणाऱया किंवा जिल्हय़ात असणाऱया ज्या लोकांमध्ये कोरोनासदृश लक्षणे आढळतात, अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येऊन उपचार केले जातात. गेल्या आठवडय़ात आयसोलेशन वॉर्डमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्या दोन्ही रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्या दोन्ही रुग्णांचा अन्य आजारांमुळे मृत्यू झाल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. त्यानंतर बुधवारी आयसोलेशन वॉर्डमधील दोघांचा व होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या आचरा येथील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये बुधवारी मृत्यू झालेल्या 80 वर्षीय वृद्धाचा यापूर्वीच कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 35 वर्षीय त्या तरुणाचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या दोन्ही रुग्णांचा अन्य आजारांमुळे मृत्यू झाला आहे. तर होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या आचरा येथील त्या महिलेचाही अन्य आजारपणामुळे मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तसेच 23 एप्रिल रोजी आयसोलेशन वॉर्डमध्ये आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील एका 21 वर्षीय युवतीचा समावेश आहे. तिचाही यापूर्वीच कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून अन्य आजारामुळे तिचा मृत्यू झाला आहे. तर 82 वर्षीय एका वृद्धाचा मृत्यू गंभीर आजारामुळे झाला आहे. त्याचे नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली. ही माहिती देत असतानाच ज्या रुग्णांचा आयसोलेशन वॉर्डमध्ये मृत्यू झाला, तो कोरोनामुळे झालेला नाही. अन्य गंभीर आजारामुळे झाला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसला, तरी कोरोनाची जी लक्षणे असतात, ती लक्षणे दिसणाऱया रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात येते. परंतु, बऱयाचवेळा अन्य आजारांमुळे काही लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे कोरोनाबाबत भीती लोकांनी बाळगू नये, असे स्पष्ट करण्यात आले. जिल्हा रुग्णालयात येणाऱया प्रत्येक रुग्णावर योग्य ते उपचार करण्यात येत असून अति गंभीर असणाऱया रुग्णांचा मृत्यू होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
आणखी 22 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या आणखी 22 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नव्याने आणखी 22 जणांचे नमुने कोरोना तपासणीसाठी बुधवारी पाठविण्यात आले असून एकूण 31 नमुन्यांचा कोरोना तपासणी अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत एकूण 228 नमुने कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 197 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एकमेव पॉझिटिव्ह रुग्ण वगळता 196 जणांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर पॉझिटिव्ह आलेला रुग्णही कोरोनामुक्त झाला आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डमध्ये 62 रुग्ण दाखल असून संस्थात्मक अलगीकरणामध्ये सात रुग्णांची वाढ होऊन 67 रुग्ण दाखल आहेत. तर होमक्वारंटाईन करण्यात आलेल्या 423 व्यक्तींमधून 152 व्यक्ती होम क्वारंटाईनमुक्त झाल्याने 271 व्यक्ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात गुरुवारी 2277 व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.
जिल्हय़ात 800 बेडची व्यवस्था
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये सद्यस्थितीत एकही कोरोनाबाधित रुग्ण नसला, तरी सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचबरोबर जिल्हय़ात कोरोनाबाधित रुग्ण किंवा कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास त्यांना आयसोलेशन वॉर्डबरोबरच संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हय़ात काही प्रमाणात पासेस मिळवून चाकरमानी मंडळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा कोलमडू नये, यासाठी जिल्हा रुग्णालयात 100 बेडची व्यवस्था तसेच उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, हॉटेल्स व शैक्षणिक संस्था मिळून सुमारे 800 बेडची व्यवस्था पूर्वतयारी म्हणून करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या उपाययोजना व खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
घरीच अलगीकरण 0271
संस्थात्मक अलगीकरण 0067
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 0228
अहवाल प्राप्त झालेले नमुने 0197
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 0001
निगेटिव्ह आलेले नमुने 0196
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 0031
विलगीकरण कक्षात दाखल 0062
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 0000
गुरुवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 2277