मद्यपी दिसला की त्याच्याकडून गडकिल्यांची स्वच्छता करुन घेण्याची शिक्षा होणार : जिह्यातल्या गडकिल्यांवर शिवभक्तांचा राबता वाढला
प्रतिनिधी / सातारा
अलिकडच्या काही वर्षामध्ये काही विघ्नसंतोषी मंडळीकडून गडकिल्याच्या परिसरात नवीन वर्षांचे स्वागत करण्याचे फॅड केले जाते. परंतु शिवभक्त मावळय़ांकडून अशा विघ्नसंतोषी मंडळींना अटकाव करण्यासाठी गडकिल्यांवर खडा पहारा मोहिमेचे आयोजन केले आहे. बुधवारी सायंकाळपासूनच ही मोहिम हाती घेतली आहे. जो चुकीचे प्रकार करायला गडावर येइं&ल त्याला गडाच्या परिसरात स्वच्छता करुन घेण्याची शिक्षा देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
नवीन वर्ष साजरे करण्याची, मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही मंडळी जुन्या ऐतिहासिक अशा गडकिल्यांच्या ठिकाणी जातात. तेथे जावून नको ते प्रकार करत असतात. अशा चुकीच्या प्रकारामुळे गडकोटांचा परिसर मलिन होतो. गडकोटांचे पावित्र्य राखण्यासाठी शिवभक्तांची तयारी दोन दिवसांसाठी सुरु आहे. शिवभक्तांनी पक्के नियोजन करुन दि.30 ते दि. 1 जानेवारीपर्यंत जिह्यातील 26 गडांवर जाणाऱयाची तपासणी करण्याकरता पोलीस चेकनाका उभारावा, अशी मागणी शिवभक्तांनी केली होती. पोलिसांनी जरी चेकनाके दिले नसले तरीही शिवभक्त गडकोटांच्या रक्षणासाठी सरसावले आहेत. प्रत्येक भागातील शिवभक्त स्वतःहून गडकोटांवर खडा पहारा लावला आहे. रात्री 12 वाजेपर्यंत गडकोटांच्या परिसरात हा शिवभक्तांचा पहारा असून जर कोणी मद्यपी दारु पिवून चुकीचे प्रकार करताना आढळून आल्यास अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई म्हणून परिसराची स्वच्छता करुन घेणार आहे.
चुकीचे कृत्य केल्यास दांडक्याने चोपणार
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात अनेक गडकिल्ले उभे केले. ते गडकिल्ले आमच्यासाठीसाठी जीव की प्राण आहेत. त्या गडकिल्यांच्या परिसरात जर कोणी 31 डिसेंबर साजरा करायला आला तर सुट्टी नाही. त्याचा दांडक्याने फुल समाचार घेतला जाईल याची अगोदरच नोंद घ्यावी.