अनंतनाग, कुलगाममध्ये चकमक : एक जवान हुतात्मा
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्हय़ात गुरुवारी झालेल्या वेगवेगळय़ा चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले. हे सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित होते. आतापर्यंत 4 दहशतवाद्यांची ओळख पटली असून त्यापैकी दोघे पाकिस्तानी आणि दोघे स्थानिक असल्याची माहिती लष्करी सूत्रांकडून देण्यात आली. याचदरम्यान एक जवान हुतात्मा झाला असून जखमी झालेल्या दोन जवानांवर इस्पितळात उपचार सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा जिल्हय़ातील त्राल भागात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. दरम्यान, काश्मीर खोऱयात डिसेंबर महिन्यात 24 दहशतवादी मारले गेले असून त्यापैकी 5 पाकिस्तानी आहेत.
चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस जखमी झाला आहे. उपचारादरम्यान एका जवानाने अखेरचा श्वास घेतल्याने तो हुतात्मा झाला. जसबीर सिंग असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. तो मूळचा पंजाबमधील तरनतारण जिल्हय़ातील आहे. लष्कराच्या अधिकाऱयांनी जसबीर यांच्या कुटुंबियांना त्यांच्या हौतात्म्याची माहिती दिली आहे. चकमकीत ठार झालेल्या दोन स्थानिक दहशतवाद्यांची नावे निसार अहमद खांडे आणि मुफ्ती अल्ताफ अशी आहेत. त्यांच्याकडून एक एम-4 रायफल, 7 मॅगझिन, 2 एके सीरीज रायफल, 2 मॅगझिन, एक पिस्तूल आणि 2 मॅगझिन, 3 ग्रेनेड आणि अन्य गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले.