फर्मागुडी येथील घटना, जीव्हीएम सर्कल ठरतेय धोकादायक
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पणजी महामार्गावरील फर्मागुडी-फोंडा येथील जीव्हीएम सर्कलजवळ वॉल्वो बस व अन्य बसमध्ये झालेल्या अपघातात प्रवाशी बसचालकासह दोन प्रवाशी जखमी झाले. प्रवाशी बसचालक सुजीत सुंदर नाईक (45, चिंचणी-वेळगे), रवीजा सुभाष नाईक (19, निरंकाल-दाभाळ) व राजेंद रघू नाईक (43, गावणे बांदोडा) अशी जखमींची नावे आहेत. सदर घटना काल गुरुवारी सकाळी 11 वा. सुमारास घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवाशी बस जीए 01 डब्ल्यु 4519 फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर काही प्रवाशांना उतरविल्यानंतर नवीन बसस्थानकावर जाताना फर्मागुडी येथील धोकादायक जीव्हीएम सर्कलचा वळसा घेत असताना हा अपघात घडला. पणजीहून-फोंडाöढवळी बायपासमार्गे मडगाव दिशेने जाणाऱया वॉल्वो बस एमएच 14 एचजी 4785 जीव्हीएम सर्कलजवळ वळसा घेत असताना प्रवाशी बसची निसटती धडक बसली. या धडकेत प्रवाशी बसचे चालक व दोघे प्रवाशी जखमी झाले.
दरम्यान तत्पुर्वी फर्मागुडी येथील जीव्हीएम विद्यालयाजवळ काही प्रवाशी उतरले होते. दुर्देवाची घटना म्हणजे जुन्या बसस्थानकावरून नवीन बसस्थानकावर जाण्यासाठी प्रवाशी बसवर चढलेल्या अन्य एका चालकाचाच या जखमीमध्ये समावेश आहे. सुदैवाने यावेळी जेमतेम दोन-तीन प्रवाशी बसमध्ये होते तसेच या नाक्यावर नेहमी विद्यार्थ्यांची वर्दळ असते, विद्यार्थ्यांना सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या धडकेत प्रवाशी बसच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून वॉल्वो बसची किरकोळ नुकसानी झाली आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जखमीना फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थतेंमुळे चालक सुजीत याला बांबोळी येथील गोमेकॉत दाखल केले आहे. याप्रकरणी हवालदार सुरज गावडे अधिक तपास करीत आहे.
वॉल्वो बस चालकाचा निष्काळजीपणा
धोकादायक फर्मागुडी सर्कल प्रवाशी बस ओलांडत असल्यामुळे अन्य दोन अवजड वाहने तीला वाट देण्यासाठी थांबली होती, मात्र वॉल्वो बसने मिळेल त्या जागेतून वाट काढत ढवळीमार्गे जाण्याचा प्रयत्न केल्याने हा अपघात झाल्याचा अन्य प्रवाशी बसच्या चालकांचे म्हणणे आहे.
जीव्हीएम सर्कल धोकादायक
वारंवार या धोकादायक जीव्हीएम सर्कलजवळ अपघाताचे सत्र सुरू असूनही सार्वजनिक बांधकाम खाते व वाहतूक पोलीस कोणतीच उपाययोजना करीत नसल्यामुळे बांदोडा पंचायतीचे सरपंच राजेश नाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. फोंडा-पणजी महामार्गावरील फर्मागुडी सर्कल व सफा मशिद येथे अंडरपासची गरज असून महामार्गाअंतर्गत हे काम हाती घेऊन अपघातावर तात्काळ उपाययोजना व्हावी अशी मागणी नाईक यांनी केली आहे.