18 राज्ये-केंदशासित प्रदेशांमध्ये आशेचा किरण, कोव्हीशिल्डचा एक डोसही प्रभावी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या तब्बल दोन महिन्यांमध्ये प्रथमच देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे सुखद वृत्त मिळाले आहे. सोमवार संध्याकाळ ते मंगळवार संध्याकाळया चोवीस तासांच्या काळात नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्या टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसू लागली आहे, अशी माहिती देण्यात आली.
लसीकरणाचे प्रमाणही वाढले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत एकंदर 17 कोटी लोकांहून अधिक लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. दुसरा डोस मिळालेल्यांचे प्रमाण कमी असले तरी आगामी काही दिवसांमध्ये ते वाढणार आहे. दुसरा डोस घेणाऱयांना लसीकरणात प्राधान्य द्यावे, असा आदेश केंद्र सरकारने काढला आहे. देशभरात आता एकंदर रुग्णसंख्या 2 कोटी 29 लाख 92 हजार 517 इतकी असून बरे झालेल्यांची संख्या 1 कोटी 90 लाख 27 हजार 304 इतकी आहे. उपचाराधीन रूग्णसंख्या 37 लाख 15 हजार 221 इतकी आहे.
फॅबीफ्यू ठरतेय प्रभावी
भारतात विपुल प्रमाणात उपलब्ध असणारे फॅबीफ्ल्यू हे औषध सौम्य प्रमाणातील कोरोनावर प्रभावी ठरत आहे, असा अनुभव अनेक रुग्णालयांनी व्यक्त केला आहे. मात्र, काहीही असले तरी या औषधाचा उपचार स्वतःच्या मनाप्रमाणे करू नये. कोणती औषध योजना करायची हा निर्णय डॉक्टरांवरच सोपवावा, असेही तज्ञांकडून आणि अनुभवी डॉक्टरांकडून स्पष्ट करण्यात आले.
आयव्हरमॅक्टिनसंबंधी इशारा
गोवा सरकारने आयव्हरमॅक्टिन या औषधाला अनुमती दिली असली तरी अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने याला मान्यता दिलेली नाही. या औषधाचा उपयोग केवळ वैद्यकीय चाचण्यांकरीताच करावा. नेहमीचे औषध म्हणून आत्ताचा त्याचा मोठय़ा प्रमाणात उपयोग करू नये. या औषधाचे शरीरावर इतर परिणाम कोणते होतात, याचा पुरेसा अभ्यास अद्याप झालेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले.
डीआरडीओचे औषध लवकरच
भारतीय संरक्षण विकास आणि संशोधन संस्थेने कोरोनावरील प्रभावी औषधाचा शोध लावला आहे. या औषधाला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. हे औषध मे महिन्याअखेरीपर्यंत बाजारात येईल. या औषधामुळे कोरोना रुग्णाचे ऑक्सिजनवरचे अवलंबित्व पुष्कळ कमी होते असे आढळले आहे.
दुसऱया डोसला प्राधान्य द्या
ज्या व्यक्तींनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, दुसऱया डोससाठी प्राधान्य द्यावे. सध्या लसींचा पुरवठा सर्वांना पुरेल इतका नाही. उत्पादन वाढविले जात आहे. लवकरच ते पुरेशा प्रमाणात होईल. तथापि, तोपर्यंत दुसऱया डोससाठी प्रतीक्षा करणाऱया व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असा आदेश केंद्राने काढला आहे.
नव्या कोरोनावर लस प्रभावी
भारतात दिसून येणारे कोरोनाचे नवे रूप चिंताजनक असले तरी ते लसींवर मात करू शकत नाही. भारतात निर्माण झालेल्या, तसेच जगातील इतर देशांमध्ये तयार झालेल्या लसी या कोरोनाच्या भारतीय रुपावरही परिणाम कारक आहेत. त्यामुळे लसीकरणावर भर द्यावा, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने दिला.
लॉकडाऊन आणि लसीकरण
भारतातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी एक महिनाभर पूर्ण लॉकडाऊन करा आणि या काळात जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करा, अशी सूचना अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अँथोनी फुस्सी यांनी भारत सरकारला दिला आहे. लसीकरणाने कोरोना त्वरित आटोक्यात येतो. परिणामी, लसीकरण व लॉकडाऊन याशिवाय भारताला तरणोपाय नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.