संदीप निगळय़े यांचे एक रुटीन संपवून दुसरे सुरु
प्रतिनिधी /फोंडा
मागील महिनाभर प्रचाराची धामधूम सुरु असली तरी त्यापूर्वीच म्हणजे 8 ऑक्टो. पासून आपण ‘घरघर चलो अभियान’ सुरु केले होते. सोमवारी सायंकाळी मतदान आटोपून घरी पोचायला बराच उशिर झाला. पण मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणेच 5.45 वा. जाग आली व पुढील दिनक्रम सुरु झाला. साधारण दोन महिन्यानंतर ऑफिसच्या कामात लक्ष घालीत होतो. त्यामुळे कुठून सुरुवात करायची हा प्रश्न होता. तसे अधूनमधून ऑफिसमध्ये येणे जाणे होतेच, पण आता निवडणुकीचा भाग बाजूला ठेवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची होती. त्यामुळे सकाळी 9.30 ते 11 वाजेपर्यंत जुळवाजुळव करून घेतली. त्यानंतर कार्यकर्त्यांशीच मतदानासंबंधी फोनवरच चर्चा सुरु झाली. दुपारनंतर मात्र फोंडय़ातील निवासस्थानी पूर्णवेळ विश्रांती घेतली.
प्रियोळ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदीप निगळय़े यांचा मतदानानंतरचा पहिला दिवस असा होता. संदीप निगळय़े हे बांधकाम उद्योजक असून फोंडय़ात त्यांचे कार्यालय आहे. सकाळी 9.30 वा. ते ऑफिसमध्ये पोचतात व दर मंगळवारी व शुक्रवारी त्यांची साईट विझिट असते. मागील दोन महिने साईट विझिट व व्यावसायाशी निगडीत लोकांच्या गाठीभेटी जवळजवळ बंदच होत्या. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दुसऱया दिवसापासून कार्यकर्त्यांसोबत घरातून बाहेर पडायचे, चहा नाश्ता तर एखाद्या कार्यकर्त्याच्या किंवा हितचिंतकाच्या घरीच व्हायचा. दुपारी केरी येथील घरी जेवण झाल्यानंतर पुन्हा सायंकाळी कोपरा बैठका सुरु व्हायच्या. बैठका एकाच ठिकाणी न होता प्रमुख कार्यकर्त्यांनी विविध भागात आयोजित केलेल्या असायच्या. हे सर्व आटोपल्यावर दरदिवशी रात्री 10 वा. नंतर पुन्हा दिवसभराचा आढावा व त्यानंतर घरी पोचेपर्यंत रात्रीचे 12.30 वाजायचे. या काळात मोर्निंग वॉक व वाचन बंदच झाले. दुपारचे जेवण घरी तर रात्री प्रचाराच्या ठिकाणी. कार्यकर्त्यांच्या घरी जे काय मिळेल ते खायचे व भरपूर पाणी पिऊन आरोग्य सांभाळणे असा एकंदरीत दिनक्रम चालायचा. तसा यापूर्वी भाजपा कार्यकर्ता म्हणून प्रचार केलेला आहे. पण प्रत्यक्ष उमेदवार म्हणून प्रियोळ मतदारसंघ अधिक जवळून बघता आला. येथील लोकांच्या मनात शिरता आले. प्रियोळात आजही असे काही भाग आहेत, जेथे प्राथमिक सुविधांची आजही वानवा आहे. साधारण दोन महिने प्रचारामुळे एक विशिष्ठ दिनक्रम व कार्यकर्त्यांची जवळीक परिवारच तयार झाली होती. मतदान संपल्यानंतर त्यातून बाहेर पडताना प्रत्येकाचे मन भरून आले. एक रुटीन संपून दुसरे सुरु करायचे होते.