अंथरूणावर पडल्यानंतर लवकर झोप न येणं, ही कित्येकांची समस्या आहे. अनेकांना तर तासतासभर निद्राप्रतीक्षा करत तळमळत वेळ काढावा लागतो. आजच्या धाकाधाकीच्या जीवनशैलीत तर झोपेचं ‘खोबरं’ होणं ही नित्याचीच बाब बनली आहे. प्रत्येक मार्चचा तिसरा शुक्रवार हा आंतरराष्ट्रीन निद्रादिन म्हणून पाळला जातो. तो कालच झाला. त्यानिमित्त प्रसारित होत असलेली ‘दोन मिनिटांमध्ये झोप येण्याची युक्ती सध्या लोकप्रिय होत आहे.
युक्ती समजून घेण्यापूर्वी तिचा थोडा इतिहासही समजून घेणं मनोरंजक ठरेल. ही युक्ती प्रथम अमेरिकेच्या सैन्याधिकाऱयांनी शोधली. तिची माहिती ‘रिलॅक्स अँड विन – चँपियन परफॉर्मन्स’ या नावाच्या पुस्तकात देण्यात आली आहे. ही युक्ती 1981 मध्येच शोधण्यात आली. तथापि, ती सध्याच्या ‘निद्रानाशा’च्या काळात लोकप्रिय होत आहे. विशेषतः सैनिकांकडून तिचा उपयोग केला जातो.
तर ही युक्ती अशी आहे- आपल्या चेहऱयाचे सर्व स्नायू निथील करा. जीभ, जबडा, डोळय़ांच्या आसपासचे स्नायू व मांसपेशीना शिथील होऊ द्या. आता हे कसं करायचं ? याचं उत्तर असं की हलक्या हाताने चेहरा, डोळय़ांभोवतीची जागा व इतर स्नायू दीड-दोन मिनिटं चोळायचे. यानंतर आपले खांदे जितके खाली करता येतील, तितके करायचे, म्हणजेच मोकळे सोडायचे. श्वास पूर्ण सोडून काही सेकंद थांबायचे. याचवेळी आपले बाहू (आर्मस्) शिथील करायचे. हे झाल्यानंतर 10 सेकंद आपल्या मनातील सर्व विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. निदान विचारांचा कल्लोळ थांबविण्याचा प्रयत्न करायचा. काही आठवडय़ांच्या सरावानंतर हे जमू लागतं. एकदा हे जमलं की अवघ्या अडीच ते तीन मिनिटात आपण निद्रदेवीच्या आधीन होऊ शकता, असं सांगण्यात आलं आहे. ही युक्ती हज्फ.अज्.वस या वेबसाईटवर पहावयास मिळते, असंही म्हटलं जातं. अर्थात, हे करून पाहिल्यानंतरच खरेखोटेपणाचा अनुभव येणार आहे. तेव्हा, ज्यांना लवकर झोप लागत नाही, त्यांनी प्रयोग करून पहावयास काय अडचण आहे ?