कराड /प्रतिनिधी
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने सोमवारी धक्कादायक वळण घेतले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुढाकाराने माजी अध्यक्ष अविनाश मोहिते आणि डॉ. इंद्रजित मोहिते यांनी एकत्रित निवडणूक लढवावी, असे प्रयत्न सुरू होते. मात्र या आघाडीची बोलणी अंतिम होत नसल्याने आपण स्वतः आजपासून एकत्रीकरणाच्या प्रक्रियेतून बाहेर पडलो असल्याचे चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे कारखान्यात एकत्रीकरणाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता असून निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता बळावली आहे. अंतिम चित्र अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी 17 जूनला स्पष्ट होणार आहे.
इंधन दरवाढ व लसीकरण याबाबत केंद्र सरकारच्या धोरणांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी चव्हाण यांना, कारखाना निवडणुकीत अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रीकरणाच्या प्रक्रियेबाबत विचारले असता चव्हाण यांनी आपण आजपासून या प्रक्रियेतून बाहेर पडत असल्याचे सांगितले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत समविचारी पक्ष आणि लोकांनी एकत्र यावे, यासाठी गेले दोन महिने प्रयत्न सुरू होते. मात्र या प्रयत्नांना यश आलेले नाही. काल रात्री एकत्रीकरणाबाबत अखेरची बैठक झाली. यावेळी संबंधितांना प्रस्ताव दिला. तसेच आपण स्वतः या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे संबंधितांना सांगितले. आघाडी होईल की नाही, हे आपणास माहिती नाही. यापुढे जे काही होईल, त्याबाबत सभासद निर्णय घेतील, असे सांगत चव्हाण यांनी याबाबत आणखी बोलण्यास नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, ऍड. उदयसिंह पाटील हे एकत्रीकरणासाठी प्रयत्नशील होते. गेले दोन महिने याबाबत चर्चा आणि बैठका होत होत्या.
दरम्यान, जागा वाटप हा एकत्रीकरणात कळीचा मुद्दा होता. जागा वाटपासह अन्य काही मुद्यांवरून अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यात एकमत झाले नाही. अंतिम पर्याय निघत नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वतः या प्रयत्नांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते. दरम्यान, कारखान्याची निवडणूक तिरंगी होण्याचे संकेत असून सत्ताधारी भोसले गटाला फायदा होण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेवेळी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, मनोहर शिंदे, शंकरराव खबाले उपस्थित होते.