शाहुवाडी / प्रतिनिधी
मलकापूर येथील आदित्य मोबाईल दुकानातील दोन लाखांच्या चोरीचा शाहूवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासातच छडा लावला. याप्रकरणी कल्पेश नारायण वारंग (वय २०, रा. करुंगळे, ता. शाहूवाडी) या सराईत चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद करण्यात गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांना यश मिळाले. मलकापूर न्यायालयाने त्याला मंगळवार (ता.१७) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान चोरीच्या गुन्ह्यातील गायब असणाऱ्या दुसऱ्या संशयित आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील रत्नागिरी राष्ट्रीय मार्गालगतच्या आदित्य मोबाईल शॉपीचे छताचे सिलिंग तोडून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांचे १८ मोबाईल संच आणि इतर पूरक साहित्य मिळून २ लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी दुकान मालक बाबासो लक्ष्मण पोवार (रा. गणेशनगर, ता. शाहूवाडी) यांच्या निदर्शनास आली. याबाबत त्यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी सहा वाजता अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्वरेने चोरट्यांचा शोध सुरू केला. यावेळी ठसेतज्ञ तसेच श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले होते.