खेड-अस्तानमधील घटनेने खळबळ: वडील पालकसभेत असताना मुलींचे कृत्य
प्रतिनिधी / खेड
तालुक्यातील अस्तान-कातकरीवाडी येथे राहत्या घरी दोन शाळकरी युवतींचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. युवतींच्या मृत्यूचे नेमके कारण सायंकाळी उशिरापर्यंत समजू शकले नाही. परंतु या दोघींनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त हेत आहे.
भारती किसन हिलम (15) व साक्षी मनोहर निकम (12 दोघीही रा. अस्तान-कातकरीवाडी) अशी मृत युवतींची नावे आहेत. भारती 10 वीत तर साक्षी 8वीत शिकत होती. साक्षी बुधवारी भारतीकडे पाहुणी आली होती. भारतीचे वडील किसन हिलम हे शिक्षक-पालक संघाच्या बैठकीसाठी आंबवली-हायस्कूलमध्ये आले होते. बैठकीनंतर घरी गेले असता त्यांना दोघीही घरात मृतावस्थेत आढळल्या. दोघींना तातडीने आंबवली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना मृत घोषित केले. दोघींचेही मृतदेह विच्छेदनासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. या दोघींच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात पोलीस यंत्रणा गुंतली आहे. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
या बाबत पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याकडे संपर्क साधला असता मृत युवतींनी मासेमारी करण्यासाठी लागणाऱया गोळय़ा प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवत तपास सुरू असल्याचे सांगितले.