सेन्सेक्स-निफ्टी किचिंत घसरले – चढउताराचा प्रवास
वृत्तसंस्था/मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी भारतीय शेअर बाजारात चढउताराचे वातावरण राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये मागील दोन दिवसांच्या सत्रात तेजीचा माहोल राहिला होता. परंतु अखेर यामध्ये मंगळवारी घसरण नेंदवण्यात आली आहे.
जागतिक पातळीवरील नाकारत्मक वातावरणामुळे मजबूत हिस्सेदारी प्राप्त करणाऱया टीसीएस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 18.82 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 52,861.18 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 16.10 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 15,818.25 वर बंद झाला आहे.
दिवस भरातील कामगिरीनंतर सेन्सेक्समध्ये टेक महिंद्राचे समभाग सर्वाधिक दोन टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबतच टीसीएस, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा आणि इन्फोसिस यांचे समभाग प्रभावीत झाले आहेत. याच्या विरुद्ध बाजूला अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, टायटन आणि आयसीआयसीआय बँकेसह अन्य समभाग लाभात राहिले आहेत.
जागतिक पातळवरील अन्य बाजारातील शांघाय आणि हाँगकाँग नुकसानीत राहिले आहेत. टोकीओ आणि सोल हे बाजार नफा कमाईत राहिले आहेत. युरोपच्या प्रमुख बाजारात प्रारंभीच्या वेळी ट्रेडिंगमध्ये घसरणीचा कल राहिला आहे. याच दरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे विनिमय दर 24 पैशानी घसरुन 74.55 वर बंद झाला आहे.
अन्य प्रभाव
शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सोमवारी हा 338.43 कोटी रुपयाच्या मूल्याचे समभाग विक्री केली असल्याची माहिती आहे. यासोबतच देशातील लसीकरणाला मिळत असलेला वेग आणि विविध ठिकाणच्या अनलॉकमुळे आगामी काळात भांडवली बाजारातील स्थिती बदलत जाणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी व्यक्त केले आहेत.