वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता सलग विविध प्रकारचे सामने खेळविले जात असल्याने भारतीय निवड समितीने कसोटी आणि वनडे प्रकारासाठी स्वतंत्र संघ निवडावेत, असा सल्ला भारताचे माजी कर्णधार आणि प्रमुख प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी दिला आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने आपल्या कसोटी आणि वनडे संघाची निवड करताना खेळाडूंच्या क्षमतेचा आणि अतिताणाचा विचार केल्याचे जाणवते. क्रिकेटमधील वनडे आणि टी-20 या प्रकारामध्ये इंग्लंडचे विविध संघ तसेच विविध प्रशिक्षक निवडले गेल्याने इंग्लंडला क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात निश्चितच चांगले यश मिळत असल्याचे दिसून येते. भारतीय निवड समितीने भविष्यकाळात मर्यादित षटकांसाठी आणि कसोटीसाठी स्वतंत्र संघांची निवड करावी, असे वैयक्तिक मत कुंबळे यांनी व्यक्त केले.
टी-20 या अतिजलद प्रकारामध्ये संघात अष्टपैलूंची संख्या अधिक राहणे जरुरीचे आहे. इंग्लंडने नुकत्याच ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावताना रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला. विजेत्या इंग्लंड संघामध्ये अष्टपैलू खेळाडूंची संख्या अधिक असल्याचे जाणवते. त्याचप्रमाणे माजी विजेत्या ऑस्ट्रेलियन संघामध्येही अष्टपैलूंचा भरणा अधिक असल्याने त्यांना यापूर्वीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकता आली होती. सध्याच्या इंग्लंड संघामध्ये सातव्या क्रमांकापर्यंत भक्कम फलंदाज असल्याचे जाणवते. लिव्हिंगस्टोनला सातव्या क्रमांकावर फलंदाजीस यावे लागले होते. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन संघात मार्कुस स्टोईनिसला सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली होती. संघाची निवड करताना विविध कर्णधार आणि विविध प्रशिक्षक यांची जरुरी राहील, याची खात्री मी देऊ शकत नाही. कारण संघ निवड कशी केली जाईल, याच्यावर हे अवलंबून असते. इंग्लंडच्या कसोटी संघाचे ब्रेन्डॉन मेकॉलम हे प्रशिक्षक असून इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघासाठी मॅथ्यू मॉट हे वेगळे प्रशिक्षक आहेत. इंग्लंडच्या कसोटी आणि वनडे संघामध्ये खूपच बदल जाणवत असल्याने त्यांच्यामध्ये दर्जा निर्माण झाला आहे. सध्या इंग्लंडचा संघ हा वनडे आणि टी-20 प्रकारातील सर्वकालीन सर्वोत्तम संघ असल्याचे प्रशिक्षक टॉम मुडी यांनी म्हटले आहे.