कागल / प्रतिनिधी
उपकोषागार कार्यालयात स्थानिक औषध खरेदीची बिले मंजुर करणेसाठी दोन हजाराची लाच घेताना उपकोषागार अधिकार्याला लाचलुचपत खात्याने रंगेहाथ पकडले. मिलिंद मधुकर कुलकर्णी (वय 55, उपकोषागार अधिकारी, वर्ग – २, रा. प्लॉट नं. 69, अरुणोदय को.ऑप. सोसायटी, शाहू पार्क, राजेंद्र नगर, कोल्हापूर) असे त्यांचे नाव आहे.
मुरगूड ता. कागलच्या ग्रामीण रुग्णालय येथील स्थानिक औषध खरेदीची २० हजार रुपयांची बिले या कार्यालयात मंजूरीसाठी पाठविली होती. ती बिले मंजूर करणेसाठी कुलकर्णी याने लाच मागितली होती. सोमवारी सायंकाळी ६. ३० वाजता सापळा रचून लाच घेताना त्यास रंगेहात पकडण्यात आले.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, सहा. फौजदार संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक कृष्णात पाटील, पो.कॉ. संदीप पडवळ, मयूर देसाई, रुपेश माने, चालक पो.हे.कॉ. विष्णू गुरव यांनी या कारवाईत सहभाग घेतला.