दापोलीकरांची प्रतीक्षा संपली, शिवजयंती दिनी डॉ. आंबेडकर चौकात अनावरण
मनोज पवार/ दापोली
तब्बल दोन हजार वर्षे टिकेल असा पंचधातूने बनवलेला तब्बल 3 हजार 500 किलो वजनाचा अश्वारूढ शिवपुतळा शुक्रवारी रात्री दापोली दाखल झाला आहे. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाची शोभा वाढणार आहे. या पुतळ्यामुळे दापोलीकरांची शिवपुतळ्याची अनेक दशकांची प्रतीक्षा आता संपुष्टात आली आहे.
दापोलीमध्ये अश्वारूढ शिवपुतळा असावा अशी दापोलीकरांची जुनी मागणी होती.
दापोलीतील याआधीच्या सत्ताधाऱयांनी शिवपुतळय़ासाठी वर्गणी देखील जमा केलेली होती. मात्र या वर्गणीचे पुढे काय झाले हे सर्व दापोलीकरांना अद्याप समजलेले नाही. विद्यमान आमदार योगेश कदम हे आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवपुतळ्यासाठी जागेचा शोध घेतला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या शेजारी असणारी जोग नदीच्या लगत पात्रातील जागा शिव पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आली. यानंतर निविदा काढण्यात आली. ही निविदा मुंबई दहिसर येथील सुरुची आर्टस् यांनी कमी किमतीत भरली. दापोली नगरपंचायतीने शिवपुतळय़ासाठी चाळीस लाखाची निविदा निश्चित केली होती. मात्र सुरुची आर्ट्सने निविदा केवळ 26 लाखात भरली व त्यांना शिवपुतळा बनवण्याची ऑर्डर मिळाली.
कला अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम पाचर्णे व अमर पाचर्णे या दोन भावांनी मिळून अकरा जणांच्या मदतीने हा पुतळा दीड वर्षात पूर्ण केला. याबाबत माहिती देताना उत्तम पाचारर्णे म्हणाले की खरे तर हा पुतळा बनवण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी पुरेसा असतो. मात्र कोरोनाचा काळ मध्ये आल्यामुळे दीड वर्षाचा कालावधी हा पुतळा बनवण्यासाठी लागला. हा पुतळा पितळ, तांबे, झिंक, कथिल, स्टील या पंचधातूपासून बनवण्यात आलेला आहे.
या पुतळ्याची लांबी व रुंदी 18 फुटांची आहे. हा पुतळ्याला किमान दोन हजार वर्ष तरी काही होणार नाही अशी माहिती त्यांनी तरुण भारतशी बोलताना दिली. अश्वारूढ पुतळय़ाबद्दल बोलताना ते म्हणाले की दापोलीकरांसाठी खास शिवपुतळा बनवण्यात आलेला आहे. या पुतळ्याची प्रतिकृती केवळ आणखी एका ठिकाणी आहे. या दापोली करिता बनवण्यात आलेल्या शिवपुतळ्यातील शिवाजी महाराज यांची दृष्टी थोडी वरच्या बाजूला आहे. त्यामुळे त्यांची दूरदृष्टी या पुतळा बघतानाच लक्षात येते. हा पुतळा मुंबई येथून दापोली येथे दोन भागांमध्ये आणण्यात आला. शनिवारी दिवसभर हा पुतळा जोडण्याचे काम सुरू होते. त्याला आता मेटॅलिक कॉपरचे आवरण देण्यात येणार असून शिवजयंतीच्या दिवशी या पुतळ्याचे भव्य अनावरण करण्यात येणार आहे.
दापोलीमध्ये या पुतळ्याचे मुख उत्तरेकडे असणार आहे. यामुळे दापोली हर्णे रोड वरुन जाणाऱया येणाऱया पर्यटकांना हा पुतळा सहज नजरेस पडणारा आहे. शिवाय या पुतळ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाची शोभा देखील वाढली आहे. हा पुतळा बघण्यासाठी दापोलीकरांनी आत्तापासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे.