चौथ्या दिवशीच्या दौडला शिवाजी चौक टिळकवाडी येथून प्रारंभ
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना व लॉकडाऊनमुळे नकारात्मकता वाढली आहे. परंतु या काळातही युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करून एक सक्षम पिढी घडविण्याचा प्रयत्न दुर्गामाता दौडमधून होताना दिसत आहे. दौड म्हणजे केवळ धावणे नसून वाईट सवयीं दूर करून नव्या चांगल्या सवयींचा अंगिकार करणे, असा आहे. हेच नवचैतन्य घेऊन पहाटेच्या काळोखातून युवापिढी दौडमधून घडत आहे.
चौथ्या दिवशीच्या दौडला शिवाजी चौक टिळकवाडी येथून प्रारंभ झाला. टिळकवाडी पोलीस स्थानकाचे निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या हस्ते शिवमूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्राने दौडला प्रत्यक्ष सुरुवात झाली. ही दौड आरपीडी चौकमार्गे अनगोळमध्ये दाखल झाली. ठिकठिकाणी महिला, युवक स्वागतासाठी उभे होते. ध्वज व शस्त्रधारी धारकऱयांवर फुलांचा वर्षाव करण्यात येत होता.
अनगोळची ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरात चौथ्या दिवशीच्या दौडची सांगता झाली. रहदारी विभागाचे एसीपी शरणाप्पा यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. सामुहिक आरतीनंतर ध्येयमंत्राने दौडची सांगता झाली.