लोकप्रिय आयएस अधिकारी
प्रतिनिधी / पणजी
हसतमुख मृदू स्वभावाचे व्यासंगी वाचक आणि भारतीय संगीत व संस्कृतीचा अभ्यास असलेले आयएएस अधिकारी दौलतराव हवालदार हे बुधवारी 32 वर्षांच्या गोवा प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाले. सचिवालयात झालेल्या एका छोटेखानी समारंभात या अत्यंत लोकप्रिय अधिकाऱयाला निरोप देण्यात आला.
आयएएस अधिकारी असून सुद्धा सर्वांशी आपुलकीने व मनमोकळेपणाने वागणारे अधिकारी मिळणेच दुरापास्त. असे असले तरी 2008 मध्ये आयएएस अधिकारी म्हणून बढती मिळालेल्या दौलतराव हवालदार यांनी अरुणाचल प्रदेशात चार वर्षे वित्त सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांना गोव्यात बोलाविले. त्यानंतर पर्रीकरांच्या काळातही हवालदार वित्त सचिव म्हणून काम पाहात होते. ते गेल्या महिन्यापर्यंत. आयएएस झाल्यापासून साडेआठ वर्षे त्यांनी वित्त सचिव म्हणून कामकाज हाताळलेले होते.
15 जुलै 1988 मध्ये महाराष्ट्र नागरी सेवा अधिकारपदाचा राजीनामा देऊन गोवा नागरिसेवेत दाखल झालेल्या हवालदार यांनी अनेकविध पदे भूषविली. प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री असताना 1994 मध्ये ते मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिव म्हणून काम करू लागले. 1998 पर्यंत त्यांनी हे काम पाहिले. संगीत, चित्रपट, साहित्य वाचनाची आवड असलेल्या दौलतराव हवालदार यांनी काही दिवस माहिती संचालक, कला अकादमीचे चेअरमन, कला संस्कृती खात्याचे सचिव, रोजगार विनिमय केंद्राचे संचालक, पालिका संचालक, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अशी अनेक पदे भूषविली आहेत.
आपल्या 32 वर्षांच्या सेवेनंतर ते बुधवारी सेवानिवृत्त झाले. यानिमित्त सचिवालयात झालेल्या एका समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही झाला. त्यावेळी मुख्य सचिव परिमल राय हेही उपस्थित होते. गेल्या आठवडय़ात मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सन्मान केला होता.