ऑनलाईन टीम / लोणावळा :
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर बोर घाटातील मारुती मंदिरासमोर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक टँकर तीव्र उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्यामध्येच पलटी झाला. यामुळे मुंबईकडे जाणाऱया मार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन रस्ता ठप्प झाला. शनिवार सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सकाळी सकाळी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने मुंबईकडे जाणारी द्रुतगती महामार्गावरील वाहतूक राष्ट्रीय महामार्गावर वलवण गावाजवळ वळविण्यात आल्याने लोणावळा शहरात देखील मोठय़ प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. सकाळ दहाच्या सुमारास अपघातग्रस्त टँकर बाजूला काढण्यात आला. मात्र सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक सुरळीत होण्यास बराच काळ लागला. वाहतूक सुरळीत झाल्यानंतरही द्रुतगती महामार्ग वाहने ही राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आल्याने लोणावळा खंडाळा परिसरात तसेच वळवण एक्झीट भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारनंतर लोणावळय़ातील वाहतूक पूर्वपदावर आली.