नवीन राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान प्रक्रिया
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रपती पदासाठी सोमवार दि. 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. दिल्लीतील संसद भवनासह विविध राज्यांच्या विधिमंडळात निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार आहे. आज होणाऱया मतदानानंतर गुरुवार, 21 जुलै रोजी मतमोजणी होणार असून देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या नावाची घोषणा होणार आहे. एकीकडे एनडीएकडून आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत, तर विरोधकांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुर्मू विरुद्ध सिन्हा अशी थेट लढत होत आहे. सद्यस्थितीत एनडीएतील मित्रपक्षांसह अन्य काही प्रादेशिक पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सिन्हा यांना विरोधी पक्षांचा पाठिंबा असला तरी मतांची एकंदर जुळवाजुळव पाहता द्रौपदी मुर्मू यांचे पारडे जड दिसत आहे.
निवडणूक आयोगाने जूनमध्ये भारताच्या 16 व्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. 21 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असलेल्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे राष्ट्रपतांची निवड केली जाते. त्यात दिल्ली आणि पुदुच्चेरीच्या विधानसभांचाही समावेश आहे.
द्रौपदी मुर्मू यांना बीजेडीचा पाठिंबा
एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना बिजू जनता दलाचा (बीजेडी) पूर्ण पाठिंबा मिळेल, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रविवारी जाहीर केले. “ओडिशाची कन्या द्रौपदी मुर्मू यांना आपल्या देशाच्या सर्वोच्च पदासाठी नामांकन मिळणे ही आपल्या राज्यासाठी खरोखरच सन्मानाची आणि अभिमानाची बाब आहे’’, असे ट्विट बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनी केले आहे. 18 जुलैपासून सुरू होणाऱया राष्ट्रपतीपद निवडणूक आणि संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व बीजेडी खासदारांना त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मुर्मू यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ओडिशाच्या हिताशी संबंधित सर्व गंभीर मुद्दे संसदेत उपस्थित करण्याचे आवाहनही त्यांनी संसद सदस्यांना केले.