शारजाह / वृत्तसंस्था
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सुपर-12 फेरीत झगडत असलेल्या श्रीलंकेविरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा संघ मैदानात उतरेल, त्यावेळी स्टार फलंदाज क्विन्टॉन डी कॉकवर सारा फोकस असणार आहे. यापूर्वी वर्णद्वेषविरोधी मोहिमेत सहभागी न होता विंडीजविरुद्ध लढतीतून माघार घेतल्याने डी कॉक चर्चेत आला होता. पण, येथे त्याने लंकेविरुद्ध लढतीसाठी आपली उपलब्धता जाहीर केली आहे.
यापूर्वी, डी कॉकच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेच्या गेमप्लॅनवर फारसा विपरित परिणाम झाला नाही आणि त्यांनी विंडीजविरुद्ध सहज विजय संपादन केला. पण, येथे डी कॉक लक्षवेधी योगदान देईल, अशी व्यवस्थापनाला आशा असेल. कर्णधार बवूमाला सूर गवसणे दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. यापूर्वी मागील लढतीत त्याला 12 व 2 अशा किरकोळ धावांवर समाधान मानावे लागले आहे.
रिझा हेन्ड्रिक्स, रॅस्से व्हान डेर डय़ूसेन, एडन मॅरक्रम व डेव्हिड मिलर यांच्यामुळे दक्षिण आफ्रिकन फलंदाजी कोणत्याही प्रतिस्पर्धी गोलंदाजीच्या फडशा पाडण्याची क्षमता राखून आहे आणि लंकन संघही याला अपवाद असण्याचे कारण नाही. अर्थात, वणिंदू हसरंगा व महिश तिक्षणा यांच्यापासून आफ्रिकन फलंदाजांना सावध रहावे लागेल. दक्षिण आफ्रिका आपला मागील विजयी संघ जैसे थे ठेवण्याचे संकेत आहेत.
प्रतिस्पर्धी संघ
श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), कुशल जनिथ परेरा, दिनेश चंडिमल, धनंजया डीसिल्वा, पथूम निसांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, चमिका करुणारत्ने, वणिंदू हसरंगा, दुष्मंता चमीरा, लहिरु कुमारा, महिश तिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो.
दक्षिण आफ्रिका ः तेम्बा बवूमा (कर्णधार), केशव महाराज, क्विन्टॉन डी कॉक (यष्टीरक्षक), फॉर्च्युईन, रिझा हेन्ड्रिक्स, हेनरिच क्लासन, एडन मॅरक्रम, डेव्हिड मिलर, मुल्डर, लुंगी एन्गिडी, ऍनरिच नोर्त्झे, डेव्हॉन प्रिटोरियस, कॅगिसो रबाडा, तबरेझ शमसी, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.