माऊंट माऊंगनुई / वृत्तसंस्था
मध्यमगती गोलंदाज शबनीम इस्माईल हिने शेवटच्या षटकात 2 बळी घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध 6 धावांनी रोमांचक विजय प्राप्त केला. शेवटच्या षटकात 10 धावांचे संरक्षण करताना शबनीमने (3-41) अवघ्या 3 धावा देत 2 बळीही घेतले. दक्षिण आफ्रिकेचा हा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला.
दक्षिण आफ्रिकन महिला संघाने निर्धारित 50 षटकात 9 बाद 223 धावांची मजल मारली तर प्रत्युत्तरात पाकिस्तानला 49.5 षटकात सर्वबाद 217 धावांवर समाधान मानावे लागले.
इंग्लंडच्या डावात लॉरा वुलवार्ट (91 चेंडूत 10 चौकारांसह 75) व कर्णधार सूने लूस (102 चेंडूत 62) यांनी फटकेबाजी केली. पाकिस्तानी मध्यमगती गोलंदाज फातिमा सानाने 43 धावात 3 तर फिरकीपटू गुलाम फातिमाने 52 धावात 3 बळी नोंदवले.
प्रत्युत्तरात पाकिस्तानतर्फे ओमेमा सोहेल (65) व निदा दार (55) यांनी शानदार अर्धशतके झळकावली असली तरी विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. येथील सलग दुसऱया विजयासह दक्षिण आफ्रिकन संघ आता गुणतालिकेत तिसऱया स्थानी राहिला आहे. पाकिस्तानचा संघ शेवटच्या स्थानी जैसे थे राहिला.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिकन महिला संघ ः 50 षटकात 9 बाद 223 (लॉरा 91 चेंडूत 10 चौकारांसह 75, सूने लूस 102 चेंडूत 62. फातिमा साना 3-43, गुलाम फातिमा 3-52)
पाकिस्तान महिला संघ ः 49.5 षटकात सर्वबाद 217 (ओमेमा सोहेल 104 चेंडूत 7 चौकारांसह 65, निदा दार 72 चेंडूत 2 चौकार, 1 षटकारासह 55. शबनीम इस्माईल 9.5 षटकात 3-41, कॅप व खाका प्रत्येकी 2 बळी).